वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेतील लुईझियाना येथे एका आठ वर्षांच्या मुलीचा अत्यंत दुर्मीळ आणि घातक अशा ‘ब्रेन इटिंग अमिबा’च्या (मेंदू खाणारा अमिबा) संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. क्लेबर्न तलावामध्ये पोहल्यानंतर लिलियन स्मार्ट या बालिकेला नेग्लेरिया फाऊलेरी या अमिबाची लागण झाली होती. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रस्टन येथील रहिवासी असलेल्या लिलियन स्मार्ट हिला संसर्ग झाल्यानंतर १५ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या मेंदूला झालेली इजा अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने उपचारांना मर्यादा आल्या. तिच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत लिलियनच्या निधनाची माहिती दिली. या कठीण काळात स्थानिक व्यावसायिकांनी तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला.
हा कुठे आढळतो?
उष्ण गोड्या पाण्याच्या साठ्यांमध्ये (उदा. तलाव, नद्या, उष्ण पाण्याचे झरे).
योग्य प्रकारे क्लोरिनेशन न केलेले किंवा अस्वच्छ जलतरण तलाव.
ओलसर माती किंवा साचलेले पाणी. हा खाऱ्या समुद्राच्या पाण्यात किंवा व्यवस्थित शुद्ध केलेल्या पिण्याच्या पाण्यात आढळत नाही.
संसर्ग कसा होतो?
केवळ नाकावाटे प्रवेश : पोहताना किंवा डुबकी मारताना दूषित पाणी नाकात जोराने गेल्यास हा अमिबा नाकातील मज्जातंतूंद्वारे थेट मेंदूपर्यंत प्रवास करतो.
पाणी पिल्याने संसर्ग होत नाही : हा अमिबा असलेले पाणी चुकून प्यायल्यास पोटातील ॲसिडमुळे तो नष्ट होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याने पोटात गेल्यावर हा आजार होत नाही. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही.
सुरुवातीची लक्षणे : तीव्र डोकेदुखी, अचानक येणारा ताप, मळमळ आणि उलट्या. पुढील गंभीर लक्षणे - मान ताठ होणे, भ्रम किंवा गोंधळ उडणे, तोल जाणे, झटके येणे आणि बेशुद्धावस्था.
धोका आणि प्रतिबंध : याचा मृत्यूदर ९७ टक्केपेक्षा जास्त असल्याने काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. उबदार, साचलेल्या किंवा अस्वच्छ गोड्या पाण्यात पोहताना किंवा डुबकी मारताना नोज क्लिप वापरा किंवा नाक बंद ठेवा. उथळ उबदार पाण्यात तळाची माती ढवळू नका. जलनेती किंवा नाक स्वच्छ करण्यासाठी नेहमी उकळून थंड केलेले किंवा स्टेरलाइज्ड पाणीच वापरा.