कुनार (अफगाणिस्तान); वृत्तसंस्था : पूर्व अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात शनिवारी सकाळी एका शाळेजवळ झालेल्या भीषण स्फोटात किमान सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर ९७ जण गंभीर जखमी झाले आहेत. कुनार प्रांतीय रुग्णालयाचे प्रमुख मौला दाद यांनी 'अल जझीरा'ला दिलेल्या माहितीनुसार, ही प्राथमिक आकडेवारी असून, मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कुनार प्रांतातील अंदार सेर भागातील एका माध्यमिक शाळेला लागून असलेल्या घरात शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. कुनारचे माहिती आणि संस्कृती संचालक मौलवी समी-उल-हक यांनी सांगितले की, हे घर खाणकाम करणाऱ्या व्यक्तींचे असून, तिथे मोठ्या प्रमाणात डायनामाईट साठवून ठेवले होते. या स्फोटकांच्या साठ्यामुळेच ही दुर्घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या कुनार प्रांतातील तपास पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते मुफ्ती अब्दुल मतीन कानी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार हा स्फोट पूर्णपणे निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणामुळे घडला आहे. या घटनेतील नुकसानीचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही.
खाण उद्योगातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अफगाणिस्तानात लोहखनिज, तांबे, सोने, कोळसा आणि मौल्यवान रत्नांचे मोठे साठे आहेत. कुनार प्रांतात सध्या रत्नांच्या खाणकामाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मात्र, येथील खाण कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे अशा जीवघेण्या दुर्घटना घडतात. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही राजधानी काबूलमधील एका शाळेच्या संकुलात झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात ९ ते १४ वयोगटांतील ४० हून अधिक मुले जखमी झाली होती.