कीव्ह, वृत्तसंस्था : रशियाने बुधवारी रात्री उशिरा पूर्व युक्रेनमधील खार्कीव्हच्या होझा गावावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 51 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. मृतांमध्ये एका 6 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. हल्ला करण्यात आला त्यावेळी युक्रेनच्या एका सैनिकावर अंत्यसंस्कार सुरू होते.
रशिया नागरी वस्त्यांवर हल्ले करत आहे. जेथे हल्ला करण्यात आला त्याठिकाणी लष्कराचेही कोणीही उपस्थिती नव्हते, केवळ स्थानिक नागरिक अंत्यसंस्कारला हजर होते. रशियाच्या हल्ल्यात गावातील लोकसंख्येपैकी 20 टक्के नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
प्रेसिडेन्शियल चीफ ऑफ स्टाफ आंद्रे येरमाक आणि खार्किवचे प्रमुख ओलेह सिनिहुबोव्ह यांनी सांगितले की, युद्धापूर्वी गावाची लोकसंख्या सुमारे 500 इतकी होती तर युद्धाच्या सुरुवातीपासून तेथे 255 लोक राहत होते. यातील 51 जणांचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ज्या सैनिकावर अंत्यसंस्कार सुरू होते त्याच्या कुटुंबानेही या हल्ल्यात आपले प्राण गमावले आहेत.
यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या या महाभयंकर हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. हा हल्ला झाला त्यावेळी झेलेन्स्की पाठिंबा मिळवण्यासाठी स्पेनमध्ये झालेल्या 50 युरोपियन नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी झाले होते. युक्रेनच्या वकिलांनी हल्ल्यानंतरचे फोटो जारी केले. या फोटोंत रक्ताने माखलेले मृतदेह दिसत आहेत.
इस्कंदर क्षेपणास्त्र हल्ला
इस्कंदर क्षेपणास्त्राने गावावर हल्ला करण्यात आला. हे क्षेपणास्त्र मोठ्या इमारती आणि लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी वापरले जाते. ते डागल्यानंतर वेगाने वर जाते आणि त्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते खाली येताच शत्रूचा नाश करते. रशियाने बेलारूसमधून युक्रेनवर काही इस्कंदर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 500 किलोमीटर असून ते स्वतःसोबत 700 किलो स्फोटके वाहून नेऊ शकते.