Iraq Shopping Mall Fire
इराकमधील अल-कुट शहरातील एका शॉपिंग मॉलला लागलेल्या भीषण आगीत किमान ५० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा अधिक समावेश आहे.
या आगीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. त्यात पाच मजली इमारत रात्रभर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली दिसते. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
"एका मोठ्या शॉपिंग मॉलला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेतील मृतांची संख्या सुमारे ५० वर गेली आहे. यात अनेकजण जखमीही झाले आहेत," अशी माहिती वासित प्रांताचे गव्हर्नर मोहम्मद अल-मियाही यांनी अधिकृत आयएनए वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
राज्यपालांनी सांगितले आहे की या घटनेच्या तपासातील प्राथमिक माहिती ४८ तासांच्या आत जाहीर केली जाईल, असे आयएनएने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
हा मॉल पाच दिवसांपूर्वीच खुला करण्यात आला होता. या घटनेच्या प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की ही आग पहिल्या मजल्यावर लागली. त्यानंतर आगीने संपूर्ण इमारतीला वेढले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल मियाही यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यांनी मॉलचे मालक आणि कंत्राटदाराविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत.
रुग्णालयाबाहेर लोकांनी गर्दी केली आहे. त्यातील डॉ. नासिर अल-कुरैशी यांनी सांगितले, "आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.'' या आगीत त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला आहे. आम्ही रात्रीच्या जेवणासाठी मॉलमध्ये गेलो होतो. यादरम्यान दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एअर कंडिशनरचा स्फोट झाला. त्यानंतर आग लागली. त्यातून आमचे कुटुंबीय सुटू शकलो नाही.