आंतरराष्ट्रीय

भारताच्या हातमाग, कृषी उद्योगाला फटका; अमेरिकेकडून ५० वस्तूंवरील आयात शुल्क सवलत रद्द

Pudhari News

वॉशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेने आता चीन पाठोपाठ भारतासोबत असलेल्या व्यापार संबंधांत खोडा घातला आहे. अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या सुमारे ५० वस्तूंवरील शुल्क सवलत आज गुरुवारी रद्द केली. 

या निर्णयाचा फटका भारतातून निर्यात होणाऱ्या हातमाग आणि कृषी उत्पादनांना बसणार आहे. याचाच अर्थ भारतातून निर्यात होणारे आंबे, व्हिनेगार आदींना आता शुल्क सवलत मिळणार नाही. फेडरल रजिस्ट्ररने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की सामान्यकृत प्रणाली (जीएसपी) अंतर्गत आतापर्यंत ९० उत्पादनांना शुल्क सवलत दिली जात होती. ती आता रद्द करण्यात येत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ नोव्हेंबरपासून आयात वस्तूंवरील शुल्क सवलत रद्द केली जाणार असल्याची घोषणा गेल्या मंगळवारी केली होती. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हजारो वस्तूंवर शुल्क सवलत दिली जात होती. जीएसपी कार्यक्रमातंर्गत आयात वस्तूंवर दिली जाणारी सवलत रद्द केली जात आहे. मात्र, संबंधित देशांतून गरजेच्या वस्तू शुल्क आकारून आयात केल्या जातील, असे अमेरिकेच्या व्यापारी प्रतिनिधींकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतातून ५.६ अब्ज डॉलर वस्तूंची निर्यात… 

अमेरिकेकडून शुल्क सवलत दिल्या वस्तूंमध्ये भारतातून निर्यांत होणाऱ्या सुमारे ५० वस्तूंचा समावेश आहे. याअंतर्गत २०१७ मध्ये भारतातून ५.६ अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंची निर्यात झाली आहे. मात्र, या वस्तूंवरील शुल्क सवलत काढून टाकल्याने त्याचा परिणाम लघू आणि मध्यम उद्योगांना बसणार आहे. 

'या' देशांनाही बसणार फटका…

भारतासह अर्जेटिना, ब्राझिल, थायलंड, पाकिस्तान, तुर्कस्तान, फिलीपीन्स, इक्वाडोर, इंडोनेशिया आदी देशांतून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर दिली जाणारी सवलत देखील अमेरिकेने रद्द केली आहे.      

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT