Cyclone Ditwa | ‘दित्वा’ चक्रीवादळाचे श्रीलंकेत 46 बळी 
आंतरराष्ट्रीय

Cyclone Ditwa | ‘दित्वा’ चक्रीवादळाचे श्रीलंकेत 46 बळी

23 बेपत्ता; मदतीसाठी भारताचे ‘ऑपरेशन सागर बंधू’

पुढारी वृत्तसेवा

कोलंबो/चेन्नई; वृत्तसंस्था : दित्वा चक्रीवादळाने श्रीलंकेलेच्या किनारपट्टीला तडाखा दिला असून भयंकर पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळामुळे आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण अद्यापही बेपत्ता आहेत. चक्रीवादळ सध्या श्रीलंका आणि दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर आहे आणि पुढील 12 तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे श्रीलंका आणि भारताच्या किनार्‍यांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस, वारे, पूर आणि भूस्खलनाची शक्यता आहे.

श्रीलंकेतील स्थिती

श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने 43,991 लोकांना शाळा आणि सार्वजनिक शेल्टर्समध्ये स्थलांतरित केले आहे. येथील अनेक शाळा तात्पुरत्या बंद केल्या आहेत. रेल्वे सेवा थांबवल्या आहेत. कोलंबो स्टॉक एक्स्चेंजनेही सत्र लवकर संपवले. वादळग्रस्त भागात लष्कराच्या मदतीने लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. हेलिकॉप्टर्स, नौदलाच्या बोटी, चिलखती वाहनांचा वापर केला जात आहे.

तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशची तयारी

चक्रीवादळ दित्वा उत्तरेकडे सरकत असून 30 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशाच्या किनार्‍याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सांगितले की, राज्य तत्पर आहे. संभाव्य प्रभावित जिल्ह्यांमध्ये 16 एसडीआरएफ आणि 12 एनडीआरएफ टीम्स तैनात केल्या आहेत. आरोग्य विभागाने सर्व सरकारी रुग्णालयांना 24/7 उपलब्ध राहण्याचे निर्देश दिले आहेत.

हवामान विभागाचे आवाहन

हवामान विभागाने 70 ते 80 किमी/तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी 90 किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात. मच्छीमारी बंद ठेवावी, झाडाखाली आसरा घेऊ नये, हवामान अपडेटस्वर लक्ष ठेवावे, अशी हवामान विभागाने सूचना केली आहे.

भारताचे ‘ऑपरेशन सागर बंधू’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील मृतांप्रती शोक व्यक्त केला आणि प्रभावित कुटुंबांच्या त्वरित पुनर्वसनाची प्रार्थना केली. ते म्हणाले की, भारताने ‘ऑपरेशन सागर बंधू’ अंतर्गत तातडीची मदत श्रीलंकेकडे पाठवली आहे आणि आवश्यक असल्यास अजून मदत देण्यास तयार आहे. तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटद्वारे सांगितले की, विक्रांत आणि उदयगिरी जहाजे कोलंबोमध्ये मदत सामग्री सुपूर्द करत आहेत. भारतीय नौदलाची विमाने सायक्लोनमुळे प्रभावित भागात रेस्क्यू कार्यात सहभागी झाली आहेत. तसेच, शशी थरूर यांनी कोलंबोतर्फे येणारी विमाने थिरुअनंतपुरम येथे वळवली गेली आहेत. त्यामुळे तेथील हॉटेल्सना जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

‘दित्वा’चा अर्थ काय?

या चक्रीवादळाचे नाव ‘दित्वा’ हे येमेन या देशाने एका स्थानिक भौगोलिक स्थळावरून सुचवले?आहे. दित्वा लगून हे येमेनच्या वायव्येकडील सोकोत्रा बेटावरील खार्‍या तलावाच्या काठवरचे ठिकाण?आहे. महासागरातील चक्रीवादळांच्या नावांची यादी (रोस्टर) एकमेकांसाठी तयार केलेली असते. यामध्ये प्रत्येक देशाने आपापल्या संस्कृती/भूगोलाशी संबंधित नावे सुचवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT