ढाका; वृत्तसंस्था : बांगला देशातील राजबारी जिल्ह्यातील दौलतदिया घाटावर घडलेल्या भीषण अपघातात प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत कोसळून 26 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. ईदनंतर राजधानी ढाकाकडे परतणार्या प्रवाशांनी ही बस भरलेली होती.
बुधवारी संध्याकाळी सुमारे 40 प्रवासी घेऊन बस फेरीवर चढवली जात होती. फेरी ही मोठी नाव असून वाहनांना नदी पार करण्यासाठी वापरली जाते. मात्र बस चढवताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच बस नदीत कोसळली. प्रत्यक्षदर्शींनुसार, घटना इतक्या वेगात घडली की प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. घटनेनंतर सुरू झालेल्या बचावकार्यादरम्यान बसमधून 23 मृतदेह बाहेर काढण्यात आले, ज्यामध्ये 11 महिला, 8 पुरुष आणि 5 लहान मुलांचा समावेश आहे. तसेच 8 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले होते, मात्र त्यापैकी 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 26 वर पोहोचली आहे.
काही प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बसमध्ये अनेक प्रवासी एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. काही प्रवासी बसबाहेर उभे असल्यामुळे बचावले, मात्र त्यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याने हृदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली आहे.दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस, सेना, कोस्टगार्ड आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे मोठे बचाव अभियान राबवले. 4 अग्निशमन पथके आणि 10 पाणबुडे तैनात केले होते. ‘हमजा’ जहाजाच्या मदतीने सुमारे 6 तासांच्या प्रयत्नांनंतर बस बाहेर काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.
चौकशीचे आदेश
पंतप्रधान तारिक रेहमान यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. 5 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून अतिरिक्त जिल्हाधिकार्याच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात येणार आहे. 3 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.