इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) च्या हल्ल्यांमध्ये सतत वाढ होत आहे. नुकत्याच झालेल्या रेल्वे अपहरणाच्या घटनेनंतर पाकिस्तानी लष्करावरही हल्ले वाढले आहेत. बलुचिस्तानमध्ये वारंवार होणार्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्यात भीतीचे वातावरण पसरल्याने 2,500 पाक सैनिकांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. या परिस्थितीत पंतप्रधान शहबाज शरीफ आणि पाक लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्यासमोर सैन्याला एकसंध ठेवण्याचे मोठं आव्हान उभे राहिले आहे.
‘काबुल फ्रंटलाईन’ च्या अहवालानुसार, मागील काही दिवसांत पाकिस्तानच्या सैन्यावर झालेल्या सततच्या हल्ल्यांमुळे तब्बल 2,500 सैनिकांनी लष्कराची नोकरी सोडली आहे. सैन्यात वाढती असुरक्षा, सातत्याने सैनिकांचे होणारे मृत्यू आणि पाकिस्तानची ढासळलेली आर्थिक परिस्थिती यामुळे लष्करातील सैनिकांचे मनोबल खचले आहे. अनेक सैनिक पाकिस्तानमध्ये जीव धोक्यात घालण्यापेक्षा सौदी अरेबिया, कतार, कुवेत सारख्या देशांमध्ये जाऊन आर्थिक सुरक्षितता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
सैन्यातील खराब परिस्थितीमुळे सैनिकांचे मनोबल ढासळत असून, मोठ्या प्रमाणावर पलायन होत आहे. यामुळे पाक लष्कराच्या ताकदीबाबत आणि त्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. बलुचिस्तानमधील ट्रेन हायजॅक आणि नोशकीमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला या घटनांमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सैनिक हताहत झाले आहेत. परिणामी, पाकिस्तानमधील अस्थिरतेला सामोरे जाण्याऐवजी अनेक सैनिकांनी परदेशात नोकरीच्या संधी शोधण्यास प्राधान्य दिलं आहे. पाकिस्तानी सैन्य किंवा माध्यमांनी मात्र याबाबत कोणतीही अधिकृत कबुली दिलेली नाही.
एकीकडे पाकिस्तानमधील अस्थिरता वाढत असताना बलुचिस्तानमधील बंडखोर संघटना बीएलएने आपली हालचाल अधिक तीव्र केली आहे. जाफर एक्स्प्रेस ट्रेनवर झालेल्या धाडसी हल्ल्यानंतर बीएलएने आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. बलुचिस्तानमधील वाढता हिंसाचार आणि लष्करातील सैनिकांचा विश्वास कमी होत असल्याने पाकिस्तानसाठी सुरक्षा यंत्रणा टिकवून ठेवणे अधिक अवघड होत चालले आहे.