190 Children Starved to Death | स्वर्गप्राप्तीचे आमिष दाखवून १९० मुलांना उपाशी मारले! AI Photo
आंतरराष्ट्रीय

190 Children Starved to Death | स्वर्गप्राप्तीचे आमिष दाखवून १९० मुलांना उपाशी मारले!

पुढारी वृत्तसेवा

नैरोबी; वृत्तसंस्था : स्वर्गप्राप्तीचे आमिष दाखवून अनुयायांना उपाशी राहण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी केनियातील धर्मगुरू पॉल मॅकेंझे आणि त्याच्या सुमारे ३० सहकाऱ्यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात १९० मुलांसह एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मॅकेंझे राहत असलेल्या शाकाहोला जंगलात आतापर्यंत ४०० हून अधिक मृतदेह सापडले आहेत. मोम्बासा उच्च न्यायालयाने सोमवारी १९१ मृत्यूंच्या प्रकरणात निकाल दिला असून, दोषींना ६ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, मॅकेंझे ‘गुड न्यूज इंटरनॅशनल चर्च’च्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माच्या नावाखाली स्वतंत्र गट चालवत होता. जगाचा अंत जवळ आला असून उपाशी राहिल्यास स्वर्गप्राप्ती होईल, असे तो अनुयायांना सांगत असे. मुलांना प्रथम उपाशी ठेवणे, त्यानंतर महिला आणि तरुण मुलांना, तर शेवटी पुरुषांना उपाशी ठेवण्याची योजना आखण्यात आल्याचा आरोप आहे.

मार्च २०२३ मध्ये एका स्थानिक व्यक्तीने आपल्या नातेवाईकांच्या मुलांना उपाशी ठेवून मारल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी जंगलात तपास सुरू केला आणि सामूहिक कबरींमधून मृतदेह बाहेर काढले. मॅकेंझेला एप्रिल २०२३ मध्ये पुन्हा अटक करण्यात आली. पालकांसमोरच मुलांना उपाशी ठेवल्याची बाबही समोर आली. मॅकेंझे अनुयायांना मुलांना शाळेत पाठवण्यास आणि आजारी पडल्यास रुग्णालयात नेण्यासही विरोध करत असे, असा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT