Siddharth Nandyala: pudhari
आंतरराष्ट्रीय

AI ॲपद्वारे 7 सेकंदात हृदयरोगाचे निदान! अमेरिकेतील 14 वर्षीय भारतीय वंशाच्या मुलाने बनवले ॲप

Siddharth Nandyala: माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, ज्यो बायडेन यांनीही केले कौतूक

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: हृदयरोग ही अलीकडच्या काळात मोठीच समस्या बनत चालली आहे. बऱ्याचदा दुर्लक्षामुळे हृदयरोगाचे निदान होण्यास वेळ लागतो. त्यामुळे उपचारदेखील उशीरा सुरू होतात. पण, समजा हृदयरोगाचे निदान काही सेकंदात करता आले तर? आश्चर्य वाटेल पण, आता हे शक्य आहे.

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या 14 वर्षीय मुलाने एक AI ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे हृदयरोग आहे की नाही ते केवळ 7 सेकंदात कळू शकते. त्यामुळे या जिनियस मुलाचे कौतूक होत आहे. खुद्द माजी रष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि ज्यो बायडेन यांनीही त्याचे कौतूक केले आहे. (14-year-old built an AI app that detects heart disease in 7 seconds)

सर्केडियन ॲप

सिद्धार्थ नंद्याला असे या मुलाचे नाव. तो अमेरिकेतील असला तरी त्याचे मूळ भारतीय आहे. त्याने "सर्केडियन AI" हे ॲप विकसित केले आहे. ते हॉस्पिटलमध्ये वापरासाठी आहे. हृदयरोगाचे निदान काही सेकंदात करण्यास या ॲपमुळे मदत होते.

भारत आणि अमेरिकेतील हजारो रुग्णांवर या "सर्केडियन AI" ॲपची चाचणी घेण्यात आली आहे. 14 वर्षीय सिद्धार्थ डल्लास येथे राहतो. त्याच्या या नवीन शोधाने तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे.

"सर्केडियन AI" ॲप कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केवळ 7 सेकंदात हृदयाच्या ध्वनी रेकॉर्डिंगद्वारे हृदयरोग ओळखते.

ॲप कसे काम करते?

सर्केडियन ॲपमध्ये हृदयाच्या ध्वनी रेकॉर्डिंगचे विश्लेषण केले जाते. त्याद्वारे आरोग्याचे तपशील देता येतात. एक प्रकारे तुमचे हृदय तुमच्याशी बोलू लागले तर... असाच हा प्रकार आहे. हे एआय सहाय्यक साधन आहे. हेच तुम्हाला हृदयाच्या आरोग्याद्दल माहिती देते.

हे ॲप वापरण्यास अत्यंत सुलभ आहे. ते हृदयाजवळ धरून 7 सेकंद रेकॉर्ड करायचे. त्यानंतर एक निदान येते. हे ॲप हृदयरोगाचे 40 प्रकार ओळखू शकते.

अमेरिकेसह आंध्रप्रदेशात चाचणी...

ॲपचा अचूकता रेट 96 टक्के इतका आहे. अमेरिकेमध्ये 15000 पेक्षा अधिक रुग्णांवर आणि भारतात 700 पेक्षा जास्त रुग्णांवर चाचणी करण्यात आली आहे. अलीकडच्या चाचण्या आंध्र प्रदेशमधील GGH गंटूर आणि GGH विजयवाडा येथे घेण्यात आल्या.

GGH गंटूरमध्ये, AI ॲपने एका अभ्यासात 505 रुग्णांची चाचणी केली. ज्यात 10 जणांना हृदयरोग आढळून आला. दुसऱ्या अभ्यासात 863 रुग्णांची चाचणी झाली त्यात 16 CVD प्रकरणे आढळून आली. GGH विजयवाडामध्ये, त्याने 992 लोकांची चाचणी केली तिथे 19 जणांमध्ये संभाव्य हृदयरोगाच्या समस्या आढळल्या.

ॲपद्वारे फ्लॅग केलेल्या व्यक्तींना ECG आणि 2D इको स्कॅन्ससाठी पाठवले गेले. अंतिम निदानाला कार्डिओलॉजिस्ट्सनीही दुजोरा दिला. त्यामुळे हे ॲप एक विश्वासार्ह चाचणी साधन ठरले आहे.

सात महिने संशोधन

सिद्धार्थने एका मीडिया मुलाखतीत सांगितले की, जगभरात 31 टक्के मृत्यू हृदयरोगामुळे होत आहेत. हे इतके उच्च प्रमाण पाहूनच या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. जीवन वाचवू शकेल, असे काहीतरी मला करायचे होते.

या विकास प्रक्रियेत डेटा गोळा करणे, मॉडेल प्रशिक्षण आणि हॉस्पिटल चाचणी समाविष्ट होती, ज्यासाठी सुमारे सात महिने लागले.

सिद्धार्थ याने STEM IT या कंपनीची स्थापना केली आहे. त्याचे पहिले व्हेंचर एक शैक्षणिक स्टार्टअप होते. दरम्यान, टेक्नॉलॉजीशिवाय सिद्धार्थ याला गोल्फ आणि बुद्धीबळ खेळायला आवडते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना तो प्रेरणास्थान मानतो.

नवीन आयडिया हीच प्रगतीचा मार्ग आहे. कल्पनेपासून रूपांतरापर्यंत प्रवास झाला पाहिजे. स्वत:चे बॉस व्हा. स्वतःचे असे काही तरी बनवा, असे तो एका मुलाखतीत म्हटला होता. दरम्यान, सध्या हे ॲप वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध नाही. तर हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल स्क्रीनिंगसाठी आहे.

ओबामा, बायडेन, चंद्राबाबू नायडू यांनी केले कौतूक

अमेरिकेचेमाजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, ज्यो बायडेन यांनी त्याचे कौतूक केले आहे. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनीही त्याचे कौतूक केले आहे. गेल्याच महिन्यात सिद्धार्थने चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT