Pink Diamond : २४ कॅरेटचा गुलाबी हिरा तब्बल १३० कोटींना विकला; भारताशी काय आहे संबंध?  file photo
आंतरराष्ट्रीय

Pink Diamond : २४ कॅरेटचा गुलाबी हिरा तब्बल १३० कोटींना विकला; भारताशी काय आहे संबंध?

जगातील अत्यंत दुर्मिळ गुलाबी हिऱ्यांमध्ये समावेश असलेला २४ कॅरेटचा ‘बुल्गारी पिंक’ जिनिव्हा येथील लिलाव.

पुढारी वृत्तसेवा

130 crore pink diamond bulgari pink india golconda connection

पुढारी ऑनलाईन : जगातील अत्यंत दुर्मिळ गुलाबी हिऱ्यांमध्ये समावेश असलेला २४ कॅरेटचा ‘बुल्गारी पिंक’ जिनिव्हा येथील लिलावात तब्बल १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीला विकला गेला आहे. फॅन्सी इंटेन्स पिंक रंगाच्या या हिऱ्याची १२.०८६ दशलक्ष स्विस फ्रँकला खरेदी करण्यात आली.

जगातील अत्यंत दुर्मिळ रंगीत हिऱ्यांमध्ये समावेश असलेल्या २४ कॅरेटच्या गुलाबी हिऱ्याने जिनिव्हा येथील लिलावात कोट्यवधी रुपयांची किंमत मिळवली आहे. ‘बुल्गारी पिंक’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या फॅन्सी इंटेन्स पिंक हिऱ्याच्या अंगठीचा १० नोव्हेंबर रोजी क्रिस्टीजने लिलाव केला. या अंगठीला १२.०८६ दशलक्ष स्विस फ्रँक म्हणजेच सुमारे १४.८१ दशलक्ष डॉलर इतकी किंमत मिळाली. भारतीय चलनात ही रक्कम १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

एपीच्या वृत्तानुसार, या हिऱ्याचे वैशिष्ट्य केवळ त्याची किंमत एवढेच नाही, तर त्याचा भारताशी असलेला ऐतिहासिक संबंधही महत्त्वाचा आहे. क्रिस्टीजच्या माहितीनुसार, सध्याच्या मालकाच्या पणजोबा-पणजींनी १९५० च्या दशकात भारतात हा हिरा खरेदी केला होता. त्यानंतर हा कच्चा हिरा इटलीतील प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड बुल्गारीच्या रोम येथील कारागिरांकडे नेण्यात आला. तेथे त्याला सुंदर अंगठीचे स्वरूप देण्यात आले. सात दशकांहून अधिक काळ हा मौल्यवान हिरा एकाच युरोपीय कुटुंबाकडे होता.

या हिऱ्याला फॅन्सी इंटेन्स पिंक कलर ग्रेड मिळाला आहे. त्याचे वजन २४ कॅरेट असून, त्याला एमराल्ड कट देण्यात आला आहे. त्याचे वर्गीकरण टाइप टू-ए डायमंड म्हणून करण्यात आले आहे. क्रिस्टीजच्या माहितीनुसार, या श्रेणीत जगातील २ टक्क्यांपेक्षाही कमी रत्नांच्या दर्जाचे हिरे येतात.

या हिऱ्याची तुलना ऐतिहासिक गोलकोंडा हिऱ्यांशीही करण्यात आली आहे. क्रिस्टीजच्या मते, या हिऱ्याची पारदर्शकता आणि गुणवत्ता गोलकोंडा प्रदेशाशी संबंधित असलेल्या प्रसिद्ध ऐतिहासिक हिऱ्यांच्या वैशिष्ट्यांशी मिळतीजुळती आहे. एपीनेही आपल्या वृत्तात हा अत्यंत दुर्मिळ हिरा भारतातील प्रसिद्ध गोलकोंडा खाणींमधून आल्याचे मानले जात असल्याचे नमूद केले आहे.

लिलावापूर्वी क्रिस्टीजने या अंगठीची किंमत १० ते १५ दशलक्ष स्विस फ्रँकदरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. अखेर हा हिरा १२.०८६ दशलक्ष स्विस फ्रँकला विकला गेला. क्रिस्टीजचे ग्लोबल हेड ऑफ ज्वेलरी मॅक्स फॉसेट यांनी या हिऱ्याचे वर्णन ‘पिंक डायमंड्सची मोनालिसा’ असे केले होते.

भारताच्या गोलकोंडा प्रदेशाचा इतिहास जगातील अनेक प्रसिद्ध हिऱ्यांशी जोडलेला आहे. एपीच्या वृत्तानुसार, याच प्रदेशातून कोहिनूर आणि होप डायमंड यांसारखे प्रसिद्ध हिरे आले असल्याचे सांगितले जाते.

क्रिस्टीजच्या या मॅग्निफिसंट ज्वेल्स लिलावात ‘बुल्गारी पिंक’शिवाय २० व्या शतकातील सुमारे ३०० दागिन्यांचा एक खासगी संग्रहही समाविष्ट होता. यामध्ये बुल्गारी, कार्टियर आणि ग्राफ यांसारख्या नामांकित ज्वेलरी ब्रँड्सच्या दागिन्यांचा समावेश होता. मात्र, संपूर्ण लिलावात २४ कॅरेटच्या या दुर्मिळ गुलाबी हिऱ्याने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT