आंतरराष्ट्रीय

इस्रायल-हमास युद्धात 103 ठार | पुढारी

Pudhari News

तेल अविव : वृत्तसंस्था

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील हमास या संघटनेतील संघर्ष आता युद्धासारखाच पेटलेला आहे. शुक्रवारी इस्रायली फौजांनी गाझा पट्टीवरील हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढविले. एका इस्रायली दैनिकाच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात हमासचे रॉकेट प्रक्षेपणस्थळच उद्ध्वस्त झाले आहे. हमासने इस्रायलच्या दिशेने सोडलेली 300 वर रॉकेट चुकून गाझापट्टीवरच कोसळली.

हमास आणि इस्रायल संघर्षात आतापर्यंत 103 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 27 बालकांचा समावेश आहे. पैकी 7 इस्रायलची, तर उर्वरित गाझापट्टीतील आहेत. या 27 पैकी कुणाचाही या संघर्षाशी संबंध नव्हता. जखमींची संख्या 580 वर आहे. 

इस्रायलने गाझापट्टीकडे कूच केले असून, येथे सैन्य दैलाची तैनाती वाढविली आहे. गाझाहून आतापर्यंत इस्रायलवर 1 हजार 750 रॉकेट डागली आहेत. उत्तरादाखल इस्रायलने 600 वेळा हवाई हल्ले केले. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन ही मुस्लिम देशांची संघटनाही सक्रिय झाली आहे. तुर्की, सौदी, पाकिस्तानने युनोची बैठक बोलाविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. तो मंजूर केला आहे. युनोचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायल-हमास संघर्ष थांबविण्याचे आवाहन केले आहे. 

इस्रायलच्या अनेक शहरांतून ज्यू आणि अरबी मुस्लिमांत दंगली सुरू झाल्या आहेत. दंगेखोरांकडून पोलिस ठाण्यांवरही हल्ले सुरू झाले आहेत. जेरूसलेम, लॉड, हायफा, सखनेन शहरांत त्याचे प्रमाण जास्त आहे. 36 वर पोलिस जखमी झाले आहेत. 

अमेरिकेची भूमिका काय?

अमेरिकेने गुरुवारी युनोच्या सुरक्षा परिषदेत हजेरी लावली नाही. इस्त्रायलमध्ये शांततेच्या द़ृष्टीने  चीनच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीचा काहीही उपयोग नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. 

तुर्कस्तानची भूमिका काय?

दुसरीकडे तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष  रेसेप तैयप अर्दोगॉन यांनी इस्रायलच्या विरोधात जगातील मुस्लिम देशांना एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. अर्दोगॉन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांना फोन करून इस्रायलला धडा शिकविण्याची वेळ  आलेली आहे, असे सांगितलेही होते. 

परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर देशात सर्वत्र लष्कर तैनात केले जाईल; पण हमाससोबत आता तडजोड करणार नाही.

– नेतान्याहू,

पंतप्रधान, इस्रायल


 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT