वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आयात शुल्काचा मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या केलेल्या पोस्टनुसार, 1 ऑक्टोबरपासून अनेक वस्तूंवर नवे आणि मोठे कर लागू होतील. यामध्ये औषधांवर 100 टक्के, किचन कॅबिनेट आणि बाथरूम व्हॅनिटीजवर 50 टक्के, अपहोल्स्टर्ड फर्निचरवर 30 टक्के आणि मोठ्या ट्रकवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याचा समावेश आहे.
ट्रम्प यांचा आयात शुल्कावरील विश्वास अजूनही कायम असल्याचे यावरून स्पष्ट होते. त्यांच्या मते, या करांमुळे सरकारची अर्थसंकल्पीय तूट कमी होईल आणि देशांतर्गत उत्पादन वाढेल.
या शुल्कांसाठी ट्रम्प यांनी कोणताही कायदेशीर आधार स्पष्ट केला नसला, तरी त्यांनी ‘ट्रूथ सोशल’वर म्हटले आहे की, आयात केलेल्या किचन कॅबिनेट, सोफ्यांवरील कर राष्ट्रीय सुरक्षा आणि इतर कारणांसाठी आवश्यक आहे. प्रशासन आधीपासूनच 1962 च्या व्यापार विस्तार कायद्यानुसार औषधे आणि ट्रक आयातीचा राष्ट्रीय सुरक्षेवरील परिणाम तपासत आहे.
या नव्या करांमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अनिश्चितता वाढली आहे. शेअर बाजार मजबूत असला, तरी रोजगारनिर्मितीची शक्यता कमी होत आहे आणि महागाई वाढत आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी नुकतेच सांगितले की, वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळेच सध्याची महागाई वाढली आहे. ट्रम्प यांनी अनेकदा पॉवेल यांना व्याज दर कपात करण्यासाठी दबाव आणला आहे; पण वाढत्या महागाईमुळे फेडरल रिझर्व्ह सावध आहे.
2024 मध्ये अमेरिकेने सुमारे 233 अब्ज किमतीची औषधे आणि औषधी उत्पादने आयात केली होती. काही औषधांच्या किमती दुप्पट होण्याची शक्यता असल्याने आरोग्यसेवा खर्च, तसेच मेडिकेअर आणि मेडिकेडचे खर्च वाढून मतदारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवीन कॅबिनेट शुल्कामुळे घरबांधणीचा खर्च वाढू शकतो, ज्यामुळे आधीच उच्च गृहनिर्माण खर्च आणि उच्च गहाण दरामुळे घर खरेदी करू इच्छिणार्यांसाठी अधिक समस्या निर्माण होतील.
मोठ्या ट्रकच्या आयातीवर कर लावून ट्रम्प यांनी पीटरबिल्ट, केनवर्थ, फ्रेटलायनर, मॅक ट्रक्स यासारख्या देशांतर्गत उत्पादकांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
ट्रम्प यांचा नेहमीच हा दावा राहिला आहे की, आयात शुल्क कंपन्यांना देशांतर्गत कारखान्यांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास भाग पाडेल आणि ते महागाई वाढवणार नाहीत. मात्र, एप्रिलमध्ये जेव्हा ट्रम्प यांनी मोठे आयात कर लावले, तेव्हापासून महागाईचा दर 2.3 टक्क्यांवरून 2.9 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तसेच, एप्रिलपासून उत्पादक कंपन्यांनी 42,000 आणि बांधकाम व्यावसायिकांनी 8,000 नोकर्या कमी केल्याचे दिसून आले आहे.
ट्रम्प यांनी फार्मास्युटिकल औषधांवरील 100 टक्के आयात शुल्कातून सूट मिळवण्यासाठी एक अट ठेवली आहे. ज्या कंपन्या अमेरिकेत उत्पादन प्रकल्प उभारत आहेत, म्हणजेच ज्यांचे काम सुरू झाले आहे किंवा बांधकाम सुरू आहे, त्यांना हा कर लागू होणार नाही. मात्र, ज्या कंपन्यांचे अमेरिकेत आधीच कारखाने आहेत, त्यांना हा नियम कसा लागू होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.