नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या जवळ रावळपिंडी शहरातील लष्करी रुग्णालयात रविवारी संध्याकाळी (ता.२३) भीषण बॉम्बस्फोट झाल्याची माहिती आहे. या भीषण बॉम्बस्फोटात जवळपास १० जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच रुग्णालयात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर देखील उपचार घेत होता, अशी माहिती एएनआयने ट्विटरच्या आधारे दिली. एएनआयने हे वृत्त पाकिस्तानच्या क्वेटा येथील सामाजिक कार्यकर्ते एहसान-उल्लाह-मियाखेल यांच्या ट्विटरच्या आधारे दिले आहे.
एहसान-उल्लाह-मियाखेल यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'रावळपिंडीच्या लष्करी रुग्णालयात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर १० जणांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर देखील येथेच उपचार घेत आहे. या घटनेचे वार्तांकन करु नये अशी सक्त ताकीद लष्कराकडून माध्यमांना देण्यात आली आहे'.
हा स्फोट कसा झाला, याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा स्फोट की हल्ला याविषयी कोणतीच माहिती मिळालेली नाही. पाकिस्तान सरकारकडूनही याविषयी कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर या हल्ल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. काही नेटकर्यांच्या मते या स्फोटात मसूद अजहर थोडक्यात बचावल्याचे म्हटले आहे.