Rial vs dollar:  pudhari
आंतरराष्ट्रीय

10 लाख रियालची किंमत केवळ 1 डॉलर; इराणच्या चलनाची मोठी घसरण

Rial vs dollar: अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणच्या आर्थिक संकटात आणखी वाढ

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणच्या चलनाची विक्रमी घसरण झाली आहे. शनिवारी 5 एप्रिल 2025 रोजी इराणच्या रियाल (Rial) चा अमेरिकन डॉलरसोबतचा विनिमय दर निच्चांकी पातळीवर घसरला. 10 लाख 43 हजार इराणी रियालची किंमत केवळ 1 अमेरिकन डॉलर इतकी झाली.

यापुर्वी 20 मार्च रोजी फारसी नववर्ष नवरोजच्या वेळी 10 लाख इराणी रियालची किंमत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आणखी कमी झाली होती. आता रियालची किंमत आणखी घसरून 10,43,000 रियाल प्रतिडॉलर झाली.

इराणवर आंतरराष्ट्रीय निर्बंध

एपीने रिपोर्टनुसार तेहरानमधील फिरदोसी स्ट्रीटवर, जिथे चलन विनिमयाचे प्रमुख केंद्र आहे व्यापाऱ्यांनी अनिश्चिततेच्या दबावाखाली चलन विनिमय दर डिस्प्ले बोर्ड बंद केले. इराणची अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे अनेक वर्षांपासून दबावात आहे.

विशेषत: 2018 मध्ये अमेरिकेने इराणच्या अणु करारातून बाहेर पडल्यापासून या देशाची अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

ट्रम्प यांनी इराणवर आणला दबाव

2015 मध्ये करार होतानाच इराणने आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवण्याच्या बदल्यात त्यांच्याकडील युरेनियमच्या साठ्याचे प्रमाण 300 किलोग्राम आणि संवर्धनाचे प्रमाण 3.67 टक्क्यांपर्यंत मर्यादित केले होते. त्यावेळी रियाल 32000 प्रति डॉलरवर व्यवहार करत होता.

जानेवारीमध्ये पुन्हा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर ट्रम्प यांनी इराणवर दबाव आणण्यास सुरूवात केली.

ट्रम्प यांनी इराणच्या कच्च्या तेल व्यापारावर 16 संस्थांना आणि पेट्रोकेमिकल उद्योगावर प्रतिबंध घातले. यामध्ये चीनमध्ये डिस्काउंटवर तेल विकणाऱ्या कंपन्यादेखील समाविष्ट होत्या.

यामुळे रियालची किंमत आणखी घसरली. बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, तेलाच्या विक्रीत घट आणि आंतरराष्ट्रीय प्रतिबंधांमुळे महागाईचा दबाव निर्माण झाल्यामुळे इराणी चलनाची किंमत घटली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT