इस्लामाबाद : वृत्तसंस्था
कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागितली होती. त्यानुसार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकला आणखी 1.4 बिलियन डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. या आधी गेल्या वर्षी जुलैमध्ये आयएमएफने पाकिस्तानला 6 बिलियन डॉलरचे कर्ज दिले होते.
कर्जबाजारी पाकिस्तानला कोरोना व्हायरसच्या संकटाशी दोन हात करताना अक्षरशः नाकी नऊ येत आहे. त्यामुळेच पंतप्रधान इम्रान खान यांनी इतर देशांनी पाकिस्तानला उपासमारीपासून वाचवण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले होते. विकसित आणि विकसनशील देशांतील समस्या वेगळ्या आहेत. आरोग्य सेवांवर खर्च करायला निधी नाही. त्यामुळे यापूर्वीचे कर्ज माफ करावेे. उपासमारीपासून लोकांना वाचवा, अशी साद त्यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे जगाला घातली होती. तसेच जागतिक बँकेकडेही पाकिस्तानने कर्जाची मागणी केली होती. दरम्यान, पाकिस्तानात कोरोना बाधितांची संख्या 7 हजारांच्या पुढे गेली असून आतापर्यंत 134 मृत्यू झाले आहेत.