मानवी जीवनाशी अतूट नाते असलेल्या वन्य जीवनाची हानी प्रामुख्याने मानवाकडूनच होत असल्याचे दिसून आले आहे. एका बाजूला शासन आणि समाजातले काही घटक वन संवर्धनाचे जोरदार प्रयत्न करीत असतानाच व वनाचा नाश होण्यासही माणूसच कारणीभूत ठरत असल्याचे चित्र दिसते.
ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या जंगलाला नोव्हेंबर 2019 आणि मे 2020 मध्ये भीषण आगी लागल्या. जवळपास तीन आठवडे हे जगातले सर्वात मोठे जंगल जळत राहिले. अॅमेझॉनच्या 'जंगलाला आग' याचा अर्थ पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारा एक अतिशय मोठा स्रोत नष्ट होत चालला आहे. अॅमेझॉनचे जंगल ही जगातली सर्वात मोठी परिसंस्था आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक अतिदुर्मीळ प्रजाती फक्त अॅॅमेझॉनमध्ये आढळतात.
जंगल वाचविण्यासाठी पर्यावरणवाद्यांकडून योजना राबवल्या जात असतानाही जंगलाची हानी थांबलेली नाही. जंगलांना लागणार्या आणि माणसाकडून लावल्या जाणार्या आगीमुळे जंगलाची हानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. कित्येक वर्षांपूर्वी कर्नाटकातील नागरहोळे येथील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाला माणसांनी लावलेल्या आगीत हजारो एकर जंगल भस्मसात झाले. असंख्य झाडे, लहान-मोठे प्राणी जळून गेले. तत्कालीन उप-वनअधिकारी श्री. श्रीनिवासन यांच्या मते, ही आग या जंगलाच्या आश्रयाने राहणार्या वनवासी लोकांनीच लावली होती. 1989 मध्ये घेतलेल्या मोजणीप्रमाणे या भागात 6150 आदिवासी असून त्यांची वसाहत येथे आहे. त्यांच्यापैकी काही आदिवासींनी वेगवेगळ्या कारणांसाठी ही आग लावली असावी, असे श्रीनिवासन यांनी म्हटले होते.
नागरहोळे राष्ट्रीय अभयारण्यात गेल्या तीस वर्षांत अनेक वेळा वणवा भडकला. 643 चौरस किलोमीटर इतक्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या महत्त्वाच्या राष्ट्रीय अभयारण्यास लागलेली ही अलीकडची आग फार भयंकर होती. शेकडो एकर वनक्षेत्र या वणव्यात भस्मसात झाले. या अरण्याला वैयक्तिक लाभासाठी आगी लावण्याच्या समाजकंटकांच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी या समाजद्रोह्यांना शोधून काढून त्यांना गजाआड केले पाहिजे. अशा स्वार्थांधांना ठेचून काढण्यात जनतेनेही अग्रभागी राहण्याची गरज आहे.
या अरण्यात असंख्य वन्यपशु आहेत. हत्तींची शिकार करून हस्तीदंत चोरणे, चंदन, सागवान या वृक्षांची बेसुमार तोड करणे, श्वापदांना कातडीसाठी मारणे, या कारणासाठी अनेक तस्कर जंगलात धुमाकूळ घालत असतात. हे तस्करसुद्धा जंगलांना आगी लावतात. या तस्कारांना पकडण्यासाठी, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाईसाठी शासन, पोलिस, जनता या सर्वांनीच सज्ज असले पाहिजे. नागरहोळेतील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचा नाश थांबवणे व त्याचे संवर्धन करणे ही राष्ट्रीय गरज आहे. वनाधिकारी, पोलिस, राजकीय नेते, पर्यावरणवादी, सामान्य जनता या सर्वांनी परस्परांत समन्वय राखून ही जबाबदारी आता पेलायला हवी.
संपूर्ण देशात विविध ठिकाणी लागलेल्या आणि लावलेल्या आगीमुळे निसर्गसौंदर्य नष्ट होऊ लागले आहे. इमारती व फर्निचरसाठी लाकूड, सरपण आणि इतर औद्योगिक कारणासाठी येथे वृक्षतोड होत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर वनेही नष्ट होत आहेत. पर्यावरणाबरोबरच पावसाचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने ठिकठिकाणी हजारो एकर जागेत रोपवन केले. अशा अनेक ठिकाणी आगीचे आणि वृक्षतोडीचे प्रकार घडले व घडत आहेत.
जंगलांना लागणार्या आगीमुळे वनसंपत्तीचीच केवळ हानी होते असे नाही, तर वन उपजाची क्षमताही कमी होते. जमिनीचा क्षय होतो आणि जमीन नापीक होते. पाण्याची पातळी खाली जाते. वन्यजीवांची होरपळ होते. वन्य प्राणी एकतर भाजून मरतात आणि जे वाचतात त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते उघड्यावर पडतात. जंगलांच्या आगीवर मात करण्यासाठी वन खात्याने संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाच्या सहाय्याने आधुनिक वन वणवा प्रतिबंधक प्रकल्प चंद्रपूर येथे राबवला आहे. या प्रकल्पामुळे वनसंपत्तीची मोठी हानी टळणार आहे.
या प्रतिबंधक प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वणव्याचा शोध घेतला जातो. त्याची प्रात्यक्षिक चाचणी घेतली जाते. आधुनिक तंत्राने आगी विझविल्या जातात. याबाबत वन अधिकार्यांना प्रशिक्षित केले आहे. आधुनिक वन वणवा प्रतिबंधक प्रकल्प ज्या चंद्रपुरात कार्यान्वित केलेला आहे त्या भागात मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर वनविभाग, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, पश्चिम चांदा वन प्रकल्पाच्या क्षेेत्रात 1 लाख 62 हजार 800 हेक्टरमध्ये उच्च प्रतीचे सागवान आहे.
आधुनिक वन वणवा प्रतिबंधक प्रकल्प कार्यान्वित करण्यापूर्वी चंद्रपूरमध्ये वर्षाला 24 हजार हेक्टर वन वणव्यात जळून जात होते. हा प्रकल्प येथे सुरू केल्यानंतर वणव्याचे प्रमाण 95 टक्क्यांनी कमी झाले. हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वी प्रती वणव्याचे सरासरी क्षेत्र 190 हेक्टर होते. परंतु हा प्रकल्प सुरू झाल्यामुळे वणव्याचा हा सरासरी आकार आता 9 हेक्टरपर्यंत खाली आला. त्यामुळे दर हेक्टरी 9 हजार रुपयांप्रमाणे नुकसान टळत आहे.
तामिळनाडू, राजस्थान, ओरिसा, मध्यप्रदेश, केरळ, कर्नाटक, श्रीहरीकोटा येथील वन अधिकार्यांना वन वणवा प्रतिबंधक प्रकल्पांचे प्रात्यक्षिक दाखवून त्या – त्या ठिकाणच्या जंगलात हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. बंदीपूर आणि मदुमलाई अभयारण्यासाठी या प्रकल्पाचे प्रात्यक्षिक केले होते. या प्रकल्पाची अंमलबजावणी योग्यप्रकारे झाली तर भारतातील वनसंपदेची प्रतिवर्षी फार मोठ्या प्रमाणावर होणारी हानी टळेल. हा प्रकल्प महत्त्वाचा आहेच पण वनसंपत्तीची तोड आणि वणवे याबाबत जंगल परिसरातील
लोकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
– श्रीराम ग. पचिंद्रे