जागतिक जैवविविधता दिन  
Latest

राज्‍यरंग : जैवविविधतेच्या रक्षणासाठी…

Arun Patil

भूतलावर अस्तित्वात असणार्‍या जैवविविधतेपैकी 20 टक्केच प्राणी-वनस्पती-सूक्ष्मजीवांविषयी मानवाला माहिती आहे, असे म्हटले जाते. याबाबतच्या संशोधनांमधून अनेक नवीन प्रजाती जगासमोर येत असतात. निसर्गामध्ये नवीन जाती-प्रजाती निर्माण होण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते. दर पाच अथवा दहा वर्षांनी याबाबतचा अभ्यास होणं गरजेचं आहे. उद्या (दि. 22 मे ) जागतिक जैवविविधता दिन. त्यानिमित्ताने…

दरवर्षी 22 मे रोजी जागतिक जैवविविधता दिन (इंटरनॅशनल डे फॉर बायो-डायव्हर्सिटी) साजरा केला जातो. या भूतलावर विपुल प्रमाणावर जैविक विविधता (बायोडायव्हर्सिटी) आहे. पण विज्ञान-तंत्रज्ञान इतकं प्रगत आणि विकसित झालेलं असतानाही पृथ्वीतलावरील सर्व सजीवांचा, वनस्पतींचा अभ्यास अद्यापही अपूर्ण आहे. पृथ्वीतलावर कोट्यवधी प्रकारच्या सजीवांच्या जाती-प्रजाती अस्तित्वात असल्या तरी त्यापैकी मानवाला आणि विज्ञानाला केवळ 20 टक्के जैवविविधता परिचित आहे. सर्वसाधारणपणे 13 लाख प्राण्यांच्या जाती-प्रजाती आणि वनस्पती व सूक्ष्मजीवांच्या 7 लाख जाती-प्रजाती विज्ञानाला माहीत आहेत.

पृथ्वीतलावर आज अस्तित्वात असणारी सजीवसृष्टी अथवा जैवविविधता विकसित होण्यासाठी निसर्गाला कोट्यवधी वर्षांचा कालावधी लागला आहे. ही सर्व जैवविविधता उत्क्रांतीच्या प्रक्रियेमधून सुरू झालेली आहे. ही उत्क्रांती सजीवांच्या उत्पत्तीपासून आजअखेर अखंडितपणानं सुरू आहे आणि भविष्यातही ती तशीच सुरू राहणार आहे. उत्क्रांतीच्या या प्रवाहामध्ये ही जैवविविधता निर्माण होत असताना काही नैसर्गिक कारणांमुळं सजीवांच्या काही जाती-प्रजाती नष्ट झाल्या; पण त्याचवेळी नवीन प्रजाती तयार होण्याची प्रक्रियाही सुरूच राहिली आहे.

जैवविविधता आणि भूप्रदेश

ढोबळमानानं पाहिल्यास पृथ्वीतलावर उष्णकटिबंधातील भूप्रदेशांमध्ये (ट्रॉपिकल झोन) जैवविविधतेचे प्रमाण तुलनेनं अधिक आहे. शीतकटिबंधातील भूप्रदेशांमध्ये ते तुलनेनं कमी असून ध्रुवीय प्रदेशामध्ये अत्यल्प प्रमाणात जैवविविधता आहे. त्यामुळे उष्ण कटिबंधातील भूप्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टीनं सर्वांत महत्त्वाचा आहे. या भूप्रदेशामध्ये असणार्‍या वर्षावनांमध्ये (ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट) जगातील सर्वांत महत्त्वाची जैवविविधता आहे. मात्र पृथ्वीवरील एकूण जमिनीच्या केवळ 7 टक्के भूभागावर अशी वर्षावने आहेत. म्हणजेच जगातील निम्म्याहून अधिक जैवविधिता केवळ सात टक्के भागामध्ये आहे आणि म्हणूनच ती सर्वाधिक महत्त्वाची आहे. मानवाने त्याच्या सोयीनुसार या उष्णकटिबंधामध्ये देश-प्रदेश तयार केले आहेत. जगाच्या पाठीवरील 17 देश हे प्रामुख्याने जैवविविधतेनं संपन्न समृद्ध आहेत. यापैकी 12 देश हे अत्यंत महत्त्वाचे असून त्यामध्ये भारताचा समावेश आहे.

भारतातील जैवविविधता

भारतामध्ये आजमितीला प्राण्यांच्या सुमारे 98 हजार प्रजाती असून वनस्पतींच्या 48 हजार प्रजाती आहेत असं मानलं जातं. जगातील एकूण जैवविविधतेच्या 6.7 टक्के जैवविविधता भारतात आहे. जगभरातील एकूण वनस्पती संपदेच्या 7.1 वनस्पती भारतात आहेत; तर भूतलावरील एकूण प्राण्यांच्या प्रजातींपैकी 6.7 प्राणी प्रजाती भारतात आहेत. यावरून भारताची समृद्धता लक्षात येते. भारतामध्ये जैवविविधतेनं संपन्न असणारे चार प्रमुख प्रदेश आहेत.

1) ईशान्य भारत (ईस्टर्न हिमालयन रिजन) : यामध्ये अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, नागालँड, आसामचा काही भाग समाविष्ट आहे. या प्रदेशातील जंगलांमध्ये भारतातील सर्वांत मोठी जैवविविधता आहे. आजवर झालेल्या अभ्यासावरून असं दिसून आलं आहे की, या भागामध्ये 9000 सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे यापैकी 3500 प्रजाती या 'एंडेनिक' आहेत. (एंडेनिक म्हणजे त्या ठरावीक भूप्रदेशावरच उगवतात. जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही आढळत नाहीत.) त्यामुळे हा भूप्रदेश अधिक महत्त्वाचा मानला जातो.

2) पश्चिम घाट : पश्चिम घाट हा जैवविविधतेनं समृद्ध असलेला भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा भूप्रदेश आहे. पश्चिम घाटामध्ये गुजरातचा काहीसा भाग, महाराष्ट्राचा बराचसा भाग, गोवा, कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग आणि केरळचा अंतर्भाव होतो. आजवरच्या संशोधनामधून पश्चिम घाटामध्ये सुमारे 4500 सपुष्प वनस्पती आढळून आलेल्या आहेत. यापैकी जवळपास 1500 सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती एंडेनिक आहेत. त्यामुळेच ईशान्य हिमालयन रिजनबरोबरच पश्चिम घाट हादेखील जागतिक स्तरावर महत्त्वाचा मानला जातो.

3) पश्चिम हिमालयन प्रदेश (वेस्टर्न हिमालयन रिजन) : यामध्ये काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचा समावेश होतो. इथेही मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे.

4) अंदमान निकोबार : हा सर्व बेटांचा प्रदेश असून ही बेटेदेखील जैवविविधतेनं संपन्न आहेत.

अतिसंवेदनशील भूप्रदेश

शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, जगभरात जैवविविधतेच्या द़ृष्टीनं अतिसंवेदनशील असणार्‍या भूप्रदेशांची (ज्यांना जागतिक हॉटस्पॉट रिजन म्हटलं जातं) संख्या 35 आहे. या प्रदेशांमध्ये अत्यंत दुर्मीळ प्राणी आणि वनस्पतींचं वास्तव्य आहे. या प्रदेशांचं क्षेत्रफळ पृथ्वीवरील एकूण क्षेत्रफळाच्या 1.9 टक्के इतकं आहे. याचाच अर्थ भूतलावरील 9 टक्के भूप्रदेश हा जैवविविधतेच्या द़ृष्टीनं आत्यंतिक महत्त्वाचा आहे. वर उल्लेख केलेल्या 35 प्रदेशांना अतिसंवेदनशील मानण्यामागं तेथील दुर्मीळ जाती-प्रजातींचे कारण आहेच; पण त्याचबरोबर मानवी हस्तक्षेपामुळं तेथील जैवविविधता धोक्यात आलेली आहे. तिसरं कारण म्हणजे, या प्रदेशांमध्ये एंडेनिक वनस्पती आणि प्राण्यांचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे. या 35 प्रदेशांपैकी दोन अतिसंवेदनशील प्रदेश (ईशान्य रिजन आणि पश्चिम घाट) भारतामध्ये आहेत. ते आहेत अभ्यासाचा अभाव.

इतकी प्रचंड जैवविविधता असूनही भारतात त्याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झालेला नाही. त्यामुळेच वेळोवेळी झालेल्या अभ्यासामधून, पाहण्यांमधून अनेक नवनवीन प्रजातींचा शोध लागत असतो. 2015 मध्ये झालेल्या संशोधनातून ज्या 445 नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे, यामध्ये 262 प्राण्यांच्या प्रजाती असून 183 वनस्पतींच्या नवप्रजाती आहेत. यामध्ये या सरपटणार्‍या प्राण्यांच्या चार, उभयचर प्राण्यांच्या सहा, रानआल्याच्या तीन आणि अंजिराच्या तीन नवप्रजातींचा समावेश आहे. त्यानंतरही प्राणी आणि वनस्पतींच्या 176 नव्या प्रजाती आढळून आल्या होत्या. मात्र अजूनही या चारही प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करणे, अभ्यास करणे गरजेचे आहे. साधारण 40 वर्षांपूर्वी मी सातारा जिल्ह्यातील वनसंपदेवर संशोधन केलं होतं; मात्र आजही या भागामध्ये संशोधन केल्यास अनेक नवीन प्रजाती आढळतील. याचे कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणं, निसर्गामध्ये नवीन जाती-प्रजाती निर्माण होण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते. त्यामुळेच दर पाच अथवा दहा वर्षांनी याबाबतचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

इंग्लंडचे आदर्श उदाहरण

याबाबत आपण इंग्लंडचे उदाहरण पाहूया. इंग्लंडमध्ये जैवविविधतेचं प्रमाण अत्यल्प आहे; असं असतानाही जगातील सर्वांत मोठं बोटॅनिकल गार्डन इंग्लंडमध्ये आहे. जगामध्ये टेक्झॉनॉमीवर काम करणार्‍या रिसर्च इन्स्टिट्युटस् आणि प्रख्यात शास्त्रज्ञ इंग्लंडमध्ये आहेत. इंग्लंडच्या या उदाहरणावरून भारतानं बोध घेण्याची गरज आहे. आपल्याकडं विपुल प्रमाणात जैववैविध्य असूनही सर्वसामान्यांना आजही त्याविषयी माहिती नाही, त्यावर काम करणार्‍या संस्थांची, तज्ज्ञांची संख्या कमी आहे, ही बाब खेदजनक आहे. ही संख्या कमी असण्याचं मुख्य कारण म्हणजे हे मूलभूत विज्ञान आहे. आजचा काळ हा तंत्रज्ञानाचा असल्यामुळं मूलभूत विज्ञानाकडं वळणार्‍यांचं प्रमाण कमी होत चाललं आहे. वास्तविक मूलभूत विज्ञानावरच तंत्रज्ञान अवलंबून असतं; पण आपल्याला त्याचा विसर पडला आहे. तथापि, मूलभूत विज्ञानामध्ये संशोधन झालं नाही तर तंत्रज्ञान विकसितच होऊ शकत नाही. तंत्रज्ञानाच्या विकासाला सीमा आहेत; पण मूलभूत विज्ञानाला सीमा नाहीत. झूलॉजी, बॉटनी या मूलभूत विज्ञान शाखा आहेत; पण आज विद्यार्थ्यांचा सर्व कल हा तंत्रविज्ञानाकडे आहे. त्यामुळंच आपल्याकडील जैवविविधतेच्या अभ्यासाकडं मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे.

'जैवविविधतेची माहेरघरं' धोक्यात

एकीकडे अभ्यासाची ही स्थिती असताना दुसरीकडे जैवविविधतेचं माहेरघर असणार्‍या जंगलांकडंही आपलं कमालीचं दुर्लक्ष होत आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी 33 टक्के क्षेत्र वनाच्छादित असणं आवश्यक आहे, असं मानलं जातं; परंतु भारतात केवळ 20 टक्केच क्षेत्र वनाच्छादित असल्याचं शासकीय आकडेवारी सांगते. विशेष म्हणजे ही आकडेवारीही फसवी आहे. कारण वनविभागाची जंगलांबाबतची व्याख्याच चुकीची आहे. आणखी एक बाब म्हणजे, महाराष्ट्रामध्ये जंगलांची सर्वांत जास्त व्याप्ती विदर्भामध्ये आहे. त्यामुळंच ब्रिटिश काळापासून वनखात्याची मुख्य कार्यालयं विदर्भात आहेत. असं असलं तरी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जंगलांची व्याप्ती कमी असली तरी पश्चिम घाटामुळे आपल्याकडं जैवविविधता ही खूप अधिक प्रमाणात आहे.

हे व्यस्त प्रमाण जगभरात दिसून येतं. मात्र वनाच्छादित प्रदेश अधिक असणं हे जैवविविधतेसाठी आवश्यक आहे. दुर्दैवानं आज भारतात आणि महाराष्ट्रात दाट वनांचं प्रमाण घटत चाललं असून ते 13 ते 14 टक्क्यांपर्यंत खाली गेलं आहे. त्याहून अधिक गंभीर बाब म्हणजे जैवविविधतेनं समृद्ध असणार्‍या जंगलांचं प्रमाण 10 टक्केच राहिलेलं आहे. यावरून आपल्याला जैवविविधतेचं आणि पर्यावरणाचं महत्त्वच कळलेलं नाही असं दिसतं. भारतामध्ये दरवर्षी 14 लाख हेक्टरवरील जंगल नष्ट होतं, असं काही अभ्यासांमधून दिसून आलं आहे. यावरून आपण किती मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेचा र्‍हास करत आहोत याची कल्पना येते.

प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर,
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT