Latest

राष्ट्रीय युवा महोत्सवातून ‘विकसित भारत’ साकारण्याची प्रेरणा : मुख्यमंत्री

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला 'विकसित भारत @ २०४७' संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या 'शेकरू' या शुभंकराचे, बोधचिन्हाचे आणि बोधवाक्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते तसेच केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून अनावरण करण्यात आले.

या निमित्ताने नाशिक येथे महोत्सव स्थळी पालकमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड माणिक कोकाटे, डॉ. राहुल आहेर, ॲड राहुल ढिकले, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. केंद्रीय कुटूंब कल्याण व आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बोरसे, केंद्रीय सचिव मीता राजीव लोचन दृकश्राव्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राचा शेकरू हा राज्य प्राणी शुभंकर म्हणून निवडल्याबदद्ल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राला जी-२० नंतर पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी चालून आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हा राष्ट्रीय युवा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आहे. नाशिक शहराला प्रभू श्रीरामचंद्र यांचे पदस्पर्श झाले आहेत. तर तिकडे अयोध्येत श्रीराम मंदिर साकारले जात आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार होत आहे. त्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा आहे. मंदिर पुर्णत्वास जात असतानाच आपल्याला श्रीरामांचे पदस्पर्श झालेल्या नाशिक मध्ये आपण युवा महोत्सवांच्या आयोजनाची चांगली संधी मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

क्रीडा मंत्री बनसोडे म्हणाले की, युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी देशात या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही संधी महाराष्ट्राला मिळाली, याचा आनंद असल्याचे म्हटले.

शेकरू शांतता, मैत्रीचे प्रतिक

महाराष्ट्राचा शेकरू हा दिमाखदार राज्याचं वैशिष्ट्ये सर्वासमोर पहिल्यांदाच अशा स्वरुपात येत आहे. शेकरू हा शांतता, मैत्री, गतीशीलता आणि पर्यावरण प्रेमाचं प्रतिक आहे. त्यातूनही युवकांना प्रेरणा मिळेल. यावेळी बोधचिन्हांचे आणि बोधवाक्य, घोषवाक्यांचेही अनावरण करण्यात आले. 'युवा के लिए – युवा द्वारा हे बोधवाक्य आहे. तर महाराष्ट्रासाठी 'सशक्त युवा- समर्थ भारत' हे घोषवाक्य आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सव लोगो

मोदींचा रोड- शो?

विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात येणार असून तेथून ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे, त्या तपोवन मैदानापर्यंत पंतप्रधान मोदींचा रोड- शो असणार आहे. साधारणपणे दीड ते दोन लाख लोक या महोत्सवासाठी उपस्थित असणार आहे. मोदींनी या दौऱ्यामध्ये गोदा आरती करावी, काळाराम मंदीराला भेट द्यावी असे आम्हाला वाटते आहे. त्यासाठी आम्ही पत्रव्यवहार देखिल केले आहेत मात्र त्याला अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. त्याला सुरक्षेचे कारण असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT