त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या सत्तेच्या काळात विदर्भावर अन्याय झाला. विदर्भाला सर्वांत कमी निधी दिला गेल्याचा आरोप प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवदर्शन आणि राजकारण एकत्र नको, असे सुरुवातीला सांगत बावनकुळे यांनी मात्र लगेचच आघाडीमधील नेत्यांवर शरसंधान साधले. यात विदर्भाबाबत भाष्य करताना वरील वक्तव्य केले. ट्रिपल इंजिन सरकारला चौथे इंजिन लागणार असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी चौथे इंजिन कोणते असेल याबाबत बोलणे टाळले. मात्र, लवकरच मोठ-मोठे राजकीय बाॅम्बस्फोट होणार आहेत, यावर जोर देत भाजपत युती सरकारमध्ये प्रवेश करण्यासाठी काही पक्ष इच्छुक असल्याचे सूचक वक्तव्य बावनकुळे यांनी केले. उदयनिधी यांनी हिंदू संस्कृती संपविण्याचे विधान केले आहे. यामुळे आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महाआघाडीत राहायचे की नाही हे ठरवावे असे सांगितले. महाराष्ट्राची 13 कोटी जनता 2024 मध्ये याचे उत्तर देईल, असेही ते म्हणाले. दरम्यान बावनकुळे यांच्या वाहनांच्या एसकोर्ट ताफ्यातील एका वाहनाचा लहान मुलीच्या पायाला धक्का लागल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काही वेळ ताफा थांबवला. मात्र, दौऱ्यात सहभागी पदाधिकाऱ्यांनी सारवासारव करत वेळ मारून नेली. सायंकाळ उशिरापर्यंत याबाबत पोलिसांत तकार दाखल झालेली नव्हती.