Latest

..म्हणून गुवाहाटीला जावे लागले; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सरकारमध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत. मागच्या अडीच वर्षांत कदाचित स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार महाराष्ट्रात जात नव्हता; म्हणून आम्हाला गुवाहाटीला जावे लागले. गुवाहाटीला जाऊन आल्यानंतर माझेही प्रमोशन झाल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक संस्थांकडून आयोजित 'जयोस्तुते' या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

सामंत म्हणाले की, धनंजय किर यांचे पुस्तक जर राहुल गांधी यांनी वाचले असते, तर त्यांच्या तोंडून सावरकर यांच्याविषयी अपशब्द आले नसते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावर राज्यातील कानाकोपर्‍यांमध्ये सावरकर यांची खरी प्रतिमा पोहचविण्याची जबाबदारी दिली आहे. 'सागरा प्राण तळमळला' हे नाटक पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोफत दाखविण्याचा संकल्प केला आहे. मुंबईमध्ये त्याची सुरुवात होणार आहे.

सामंत म्हणाले की, सर्वच जाती-धर्माची विकासकामे करीत आहोत. महाराष्ट्रातून काही दिवसांपूर्वी एक यात्रा गेली, ही यात्रा स्वतःचे वजन कमी करण्यासाठी होती की भारत जोडण्यासाठी होती, माहीत नाही. ज्या यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला त्या वेळी यात्रेतील लोकांनी सावरकरांवर टीका करण्यास सुरुवात केली. मी या लोकांचे अभिनंदन करतो. त्यांनी जर टीकाटिप्पणी केली नसती, मला असे वाटते स्वातंत्र्यवीर सावरकर पुढील पिढीला कळले असते का? हादेखील प्रश्न आहे. म्हणून आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला, तो म्हणजे 28 मे हा स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले.

दिल्लीमध्ये खेळाडूंना ताब्यात घेतल्याप्रकरणी सामंत म्हणाले की, संसद उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. संसद हे पवित्र ठिकाण असून, त्याचे पावित्र्य प्रत्येकाने राखलेच पाहिजे. मी काही बोलून वाद वाढविणार नाही. पंतप्रधान नरेंद्र
मोदी जे करू शकले, ते दुसर्‍या कुठलेच पंतप्रधान करू शकले नाहीत, हे त्रिकालबाधित सत्य आहे. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, याची प्रचिती तुम्हाला पुढच्या दिवसांमध्ये येईल. फक्त राष्ट्रवादीच नाही तर उरलेली शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार आणि उरलेल्या खासदारांपैकी काही खासदार हे शिंदे आणि फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा सामंत यांनी केला.

मी बारामती लोकसभेवरही दावा करू शकतो…

आमच्या जागांवर भाजपचा डोळा नाही, हे निर्विवाद सत्य. पण, प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. आम्ही भाजप-शिवसेना युती म्हणूनच लढणार असून, दोघांनाही फायदा होणार आहे. कुणी कुठल्याही मतदारसंघावर दावा करू शकतो. मी बारामती लोकसभा मतदारसंघावरही दावा करू शकतो, असे उदय सामंत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT