नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : ग्रीन हायड्रोजनवर चालणारी देशातील पहिली मोटार बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लाँच करण्यात आली. मंत्री गडकरी यांनी या मोटारीतून फेरफटका मारला. ही मोटार टोयोटा आणि किर्लोस्कर कंपनीने संयुक्तपणे विकसित केली आहे. या मोटारीला 'टोयोटा मिराई' असे नाव देण्यात आले आहे. मिराई या शब्दाचा जपानी भाषेत अर्थ भविष्य असा होतो.
ही मोटार सिंगल चार्जमध्ये ही 600 कि.मी.पर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या मोटारीत हायड्रोजनचे रूपांतर विजेमध्ये होते, ज्यामुळे इंजिनला शक्ती मिळते. यातून फक्त पाणी बाहेर टाकले जाते. त्यामुळे ही मोटार पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. मोटारीत ऑनबोर्ड वीज तयार होते. ज्यावर मोटार चालवली जाते.