पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाखालील खेळत असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. गुरुवारी मलेशिया विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, ज्यानंतर टीम इंडियाला आयसीसी रँकिंग चांगले असल्याचा फायदा झाला आणि संघाने थेट सेमीफायनलचे तिकीट मिळवले. भारतीय संघाचा पुढचा सामना रविवार, 24 सप्टेंबर रोजी होणार आहे. या बाद फेरीत दुसरा संघ कोणता असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या सामन्यात मलेशियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे हा सामना प्रत्येकी 15 षटकांचा खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 15 षटकात 173 धावा केल्या. यानंतर मलेशियाच्या डावात केवळ 2 चेंडू खेळल्यानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. सामना थांबवण्यात आला. पाऊस न थांबल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
कर्णधार स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी झाली. मानधना 168.75 च्या स्ट्राइक रेटने 16 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 27 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतली.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेमिमाह रॉड्रिग्जने एका टोकाकडून वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. शेफाली वर्माही सातत्याने आक्रमक फलंदाजी करत होती. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 86 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान, शेफालीने 4 चौकार आणि 5 षटकार ठोकून 39 चेंडूत 67 धावांची उत्कृष्ट खेळी करून बाद झाली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (Asian Games 2023) इतिहासात पहिले अर्धशतक झळकावणारी ती पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे. शेफाली बाद झाल्यानंतर जेमिमाला ऋचा घोषची साथ मिळाली. दोघींनी तिसर्या विकेटसाठी 12 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. याचबरोबर टीम इंडियाने 15 षटकात 2 गडी गमावून 173 धावांपर्यंत मजल मारली. जेमिमाने 29 चेंडूत नाबाद 47 तर रिचाने 7 चेंडूत नाबाद 21 धावांची खेळी केली.
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला मलेशियाचा संघ केवळ 4 चेंडू खेळू शकला. यानंतर पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. याचबरोबर आयसीसी टी-20 मधील चांगल्या रँकिंगच्या जोरावर टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली. दरम्यान, 22 ऑक्टोबर रोजी चौथा उपांत्यपूर्व सामना खेळवला जाईल. यात बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ सेमीफायनलमध्ये भारताला आव्हान देईल. हा सामना 24 सप्टेंबर रोजी होणार आहे.
पाकिस्तान आणि इंडोनेशिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पावसामुळे सामन्यात एकही चेंडू टाकता आला नाही. पण तरीही पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. दरम्यान, श्रीलंका आणि थायलंड यांच्यातील तिसरा उपांत्यपूर्व सामना 22 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. या सामन्यात जो संघ जिंकेल त्याची पुढची लढत उपांत्य फेरीत पाकिस्तानशी होणार आहे.
जर पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत आणि दुस-या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने विजय मिळवल्यास आशियाई क्रीडा स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला पहायला मिळू शकतो. अंतिम सामना 25 सप्टेंबर रोजी होणार आहे.
शेफालीचे हे तिच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सहावे अर्धशतक ठरले. तिने भारतीय संघासाठी आत्तापर्यंत 60 सामने खेळले आहेत आणि 24.23 च्या सरासरीने आणि 132.53 च्या स्ट्राइक रेटने 1,430 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या धडाकेबाज महिला खेळाडूची सर्वोत्तम धावसंख्या 73 धावा आहे. शफालीने डिसेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे अर्धशतक झळकावले होते. गेल्या काही दिवसांपासून तिचा फॉर्म चांगला नव्हता.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games 2023) भारतीय संघाचा हा पहिलाच सामना होता जो पावसामुळे रद्द झाला. असे असूनही टीम इंडियाने एकही सामना न जिंकता थेट सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. वास्तविक, सध्या भारतीय संघ टी-20 क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. या जोरावर संघाने थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मलेशियाचे रँकिंग भारतापेक्षा खूपच खालच्या क्रमांकावर आहे. सामना रद्द झाल्याचा फायदा भारताला झाला आणि संघाने बाद फेरीचे तिकीट मिळवले.
या सामन्यात जेमिमाने चांगली सुरुवात केली. तिने 29 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. ती नाबाद राहिली. मात्र, तिला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. तिने भारतीय संघासाठी 84 सामने खेळले आहेत. या कालावधीत तिने 29.96 च्या सरासरीने आणि 113.65 च्या स्ट्राइक रेटने 1,798 धावा केल्या आहेत. रिचानेही या सामन्यात केवळ 7 चेंडूत 21 धावा केल्या. शेवटच्या षटकात तिने 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला.