भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक वाढल्याने प्रथमच सुचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 333 लाख कोटी किंवा 4 ट्रिलियन डॉलर्स झाले आहे. सध्या अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगनंतर 4 ड्रिलियनपेक्षा अधिक बाजारमूल्य असणार्या भांडवल बाजारात भारतीय शेअर बाजार समाविष्ट झाला, हा टप्पा महत्त्वाचा ठरतो. एक वर्षाच्या कालावधीत सेन्सेक्स 9.10 टक्के परतावा दिला असून त्यात गुंतवणूक असणार्यांचा 50.81 लाख कोटींचा फायदा झाला आहे.
शेअर बाजाराची ही झळाळी एका बाजूला असतानाच राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ ही 3 महिन्यांच्या कालावधीत 6.7 टक्के अंदाजीत होती, ती 7. 6 टक्के अशी झाली आहे. त्यामुळे अर्थचित्र रंगतदार झाले आहे. मॉर्गन स्टॅन्ले भांडवल बाजार निर्देशांकामध्ये भारताचे महत्त्व 0.4 टक्क्याने वाढले, ही बाबसुद्धा महत्त्वाची ठरते. शेअर बाजाराची उसळी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ आणि जागतिक गुंतवणूक मानांकनात वाढ ही आर्थिक अमृतकालाची पर्वणी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. शेअर बाजारातील घसघशीत वाढ ही प्रामुख्याने अमेरिकेने व्याजदरात 5.25 टक्के इतकी प्रचंड वाढ केल्याने निर्माण झाली. हा धक्का सहन करीत गुंतवणूक चालना देणे, हे कठीण काम भारतीय अर्थव्यवस्थेने केले आहे.
गुंतवणुकीचा ओघ भारतीयांचा व विदेशी गुंतवणूकदारांचा सकारात्मक राहिल्याने शेअर बाजारात तेजी दिसत आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी 8 हजार कोटींची गुंतवणूक वाढवली. आठवड्यात आयपीओ 3.5 लाख कोटी गुंतवणूक करणारी भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थकारणात आता सर्वाधिक पसंतीचे केंद्र बनत आहे. ही बाब अर्थधोरणाच्या यशस्वीतेचे लक्षण ठरते. विशेषतः रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रण व चलन व्यवस्थापन याबाबत सावधगिरीचा पवित्रा ठेवल्याने सर्वच गुंतवणूकदारांना सकारात्मक संदेश दिला आहे.
राष्ट्रीय उत्पन्नात या तिमाहीत होणारी अपेक्षित वाढ अनेक तज्ज्ञांच्या मते 6.7 टक्के होती. रिझर्व्ह बँकेने 6.5 टक्के वाढ अंदाजित केली होती. प्रत्यक्षात मात्र 7.6 टक्के इतका वृद्धी दर झाला. ही आश्चर्यकारक वाढ मुख्यत्वे उत्पादन क्षेत्रात 13 टक्के वाढ झाल्याने दिसते. गततिमाहीत उणे 3 टक्के होती. याच्या जोडीला सरकारी गुंतवणूक वाढ, शहरी उपभोग खर्चात वाढ, खाण उद्योगात 10 टक्क्यांनी वाढ यातून 2011-12 च्या आधार किमतीने भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 42 लाख कोटी डॉलर्स झाले. याचा परिणाम म्हणूनही भांडवल बाजारात मोठी वाढ झाल्याचे दिसते. सध्याची आर्थिक स्थिती गुंतवणूक पोषक असली, तरी ग्रामीण उत्पन्न व मागणी तसेच शेती उत्पादन व उत्पन्न ही मोठी विकास केंद्रे गतिमान करण्याचे मोठे आव्हान अद्याप आहे. जागतिक पटलावर सरासरी 6 टक्के वृद्धी दर हा इतरांच्या तुलनेत चांगला असल्याने सर्वात वेगाने व मोठ्या आकाराने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था गुंतवणुकीस प्रथम पसंतीचे ठिकाण ठरते.
वॉरेन बफे यांचे सल्लागार चार्ली मुंगेर यांनी शेअर बाजार गुंतवणूकदारांना दिलेला सल्ला आपण स्वीकारणे आवश्यक आहे. तेथे जुगारवृत्ती, तत्काळ लाभ हमखास नुकसान देत असतात. दीर्घकालीन गुंतवणूक, विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक निर्णयच चांगल्या परतावा देतात व हे भारतीय भांडवल बाजाराने गेल्या 5 दशकांत 15 टक्के परतावा चक्रवाढ पद्धतीने दिला आहे. तथापि, अद्याप केवळ 6 टक्के गुंतवणूकदार याचे लाभार्थी आहे. याचे कारण म्हणजे आर्थिक निरक्षरता. केवळ बाजार तेजीत आहे म्हणून उत्साहाने येणारे सर्वसाधारण गुंतवणूकदार थोड्याशा घसरणीने बाजार सोडून जातात; पण हे टाळण्याची गरज आहे. सध्या आपल्याकडे असणारे कमी किमतीचे शेअर्स विकून उत्तम किमतीचे शेअर्स वाढवणे हा पर्याय शहाणपणाचा ठरतो. सर्वसाधारण गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगणे हेच महत्त्वाचे!