पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय रेल्वेचे अग्निपथ योजनेच्या निषेधादरम्यान झालेल्या नुकसान आणि विध्वंसामुळे भारतीय रेल्वेचे तब्बल २५९.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज शुक्रवारी (२२ जुलै), संसदेत दिली.
संसदेच्या वरिष्ठ सभागृहात त्यांनी हा खुलासा केला. अग्निपथ योजना भारत सरकारने यावर्षी १४ जून रोजी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसह चर्चा करून सुरू केली होती. योजनेंतर्गत, 17.5 ते 21 वयोगटातील तरुणांना 4 वर्षांच्या कालावधीसाठी भरती करायचे आहे. 25% सशस्त्र दलात कायम राहतील, तर उर्वरित अग्निवीरांना ₹11 लाखांची रक्कम आणि संरक्षण मंत्रालय, पोलिस दल आणि निमलष्करी सेवांमध्ये रोजगार प्राधान्ये मिळतील, अशी ही योजना होती.
मात्र, नव्याने सुरू झालेल्या भरती योजने विरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. सुरुवातीला शांतीपूर्ण निदर्शने झाली मात्र नंतर निदर्शनांच्या बहाण्याने सशस्त्र दलातील असंख्य इच्छुक रस्त्यावर उतरले. सरकारी योजना मागे घेण्याची मागणी करताना, त्यांनी सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली, गाड्या जाळल्या आणि भारतातील विविध राज्यांमध्ये जनजीवन ठप्प झाले.
दक्षिणेकडील तेलंगणा राज्यात अग्निपथ भरती योजनेवर असंतुष्ट विद्यार्थ्यांनी सिकंदराबाद रेल्वे स्थानकाची तोडफोड केली आणि ट्रेन पेटवून दिली.
हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील नरवाना शहरात सशस्त्र दलाच्या इच्छुकांनी रेल्वे ट्रॅकही अडवले. ते रेल्वे सेवा विस्कळीत करताना आणि हातात तिरंगा घेऊन रेल्वे रुळांवर उभे असताना दिसत होते.
पलवलमध्ये, दगडफेक करणाऱ्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना हवाई गोळीबार करावा लागला. या हाणामारीत पोलिसांच्या अनेक वाहनांचे नुकसान झाले असून पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्येही असेच दृश्य पाहायला मिळाले. हिंसक आंदोलक, तोंड झाकलेले, रेल्वे स्टेशनची तोडफोड करताना आणि रेल्वे रुळांवर वस्तू फेकताना दिसले.
उत्तर प्रदेशमध्ये, इच्छुकांच्या हिंसक जमावाने आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर रोडवे बसेसच्या विंडस्क्रीनची तोडफोड केली. आंदोलनादरम्यान त्यांनी बलिया येथे एक ट्रेनही जाळली.
बिहार राज्यात 'विद्यार्थ्यांचा' रोष शिगेला पोहोचला होती. शुक्रवारी (17 जून) त्यांनी हाजीपूर रेल्वे स्थानकाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला होता.
या सर्व ठिकाणच्या आंदोलनात भारतीय रेल्वेचे मोठे नुकसान झाले. भारतीय रेल्वेचे तब्बल २५९.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज शुक्रवारी (२२ जुलै), संसदेत दिली.
हे ही वाचा :