Latest

Indian Premier League : रोहित, जडेजा, पंत महागडे खेळाडू

Arun Patil

मुंबई ; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2022 च्या महालिलावापूर्वी आठ फ्रँचायजींनी आपल्याकडील कायम ठेवण्यात येणार्‍या (रिटेन) खेळाडूंची नावे मंगळवारी जाहीर केली. यामध्ये सर्वच फ्रँचायजींनी आपल्याकडील महत्त्वाच्या खेळाडूंवर विश्‍वास दाखवला असून, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत हे या सत्रातील सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत. त्यांना प्रत्येकी 16 कोटी रुपये मिळणार आहेत.

विराट कोहली (15 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी) यांची किंमत मात्र घसरली आहे. के.एल. राहुल (पंजाब), डेव्हिड वॉर्नर, राशीद खान (हैदराबाद), हार्दिक पंड्या (मुंबई) यांच्याकडे त्यांच्या फ्रँचायजींनी कानाडोळा केला आहे.

'आयपीएल – 2020'च्या (Indian Premier League) सत्रासाठी कायम ठेवण्यात येणार्‍या खेळाडूंची यादी बीसीसीआयला सादर करण्याची 30 नोव्हेंबर ही अंतिम तारीख होती. आठ फ्रँचायजींनी एकूण 27 खेळाडूंना 'रिटेन' केले. यामध्ये 8 परदेशी तर 4 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेेश आहे.

प्रत्येक फँ्रचायजीच्या पर्समध्ये 90 कोटी रुपये रक्‍कम देण्यात आली होती, रिटेन केलेेल्या खेळाडूंना देऊन उरलेली रक्‍कम ते आता महालिलावात वापरणार आहेत. चेन्‍नई सुपर किंग्ज, दिल्‍ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी 4 खेळाडू रिटेन केले आहेत.

राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायजर्स हैदराबाद यांनी तिघांना आपल्या संघात कायम ठेवले आहे. पंजाब किंग्जने फक्‍त दोन खेळाडू 'रिटेन' केेले असून, मेगाऑक्शनसाठी त्यांच्याकडे सर्वात जास्त 72 कोटी रुपये शिल्‍लक आहेत. फ्रँचायजींनी उर्वरित खेळाडू महालिलावातून खरेदी करावयाचे आहेत; पण यावेळी 'राईट टू मॅच कार्ड'चा उपयोग करता येणार नाही.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि केरॉन पोलार्ड यांना अपेक्षेप्रमाणे 'रिटेन' केले. मात्र, चौथ्या नावाचा निर्णय घेणे त्यांच्यासाठी कठीण होते. संघात हार्दिक पंड्या, इशान किशन, क्विंटन-डी-कॉक, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, कृणाल पंड्या यांच्यासारखे दिग्गज खेळाडू असताना त्यांनी सूर्यकुमार यादवला पसंत दिली. (Indian Premier League)

चेन्‍नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड यांना रिटेन केले; पण त्याचबरोबर सुरेश रैना, फाफ-डू-प्लेसिस, अंबाती रायडू, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर यासारख्या खेळाडूंना 'रिलिज' केले. रॉयल चॅलेंजर्स बेेंगलोरने विराटसह ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजसोबत राहण्याचा निर्णय घेतला. ए. बी. डिव्हिलीयर्स आता निवृत्त झाला आहे. त्यांनी देवदत्त पडिक्‍कल, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल यासारख्या खेळाडूंना सोडून दिले.

पंजाब किंग्ज (के. एल. राहुल) आणि कोलकाता नाईट रायडर्स (इयॉन मॉर्गन) यांनी आपल्या कर्णधारांना रिटेन केले नाही. हैदराबादने अपेक्षेप्रमाणे डेव्हिड वॉर्नरला रिलिज केले; पण राशीद खानचे नाव रिटेनच्या यादीत नसणे धक्‍कादायक होते. त्यांनी केन विल्यम्सनसह अब्दुल समद आणि उम्रान मलिक या अनकॅप्ड खेळाडूंवर विश्‍वास दाखवला. राजस्थान रॉयल्सने आपला कर्णधार संजू सॅमसनसह जोस बटलर व यशस्वी जैस्वालला रिटेन केले.

के. एल. राहुल व राशीद खानवर बंदी?

भारताचा आघाडीचा फलंदाज के. एल. राहुल आणि जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक राशीद खान यांना त्यांच्या संघांनी रिटेन न केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार के. एल. राहुल व राशीद खान यांचा 30 नोव्हेंबरपर्यंत जुन्या संघासोबत करार होता, असे असतानादेखील हे दोन्ही खेळाडू दुसर्‍या फ्रेंचायजी संघांच्या परस्पर संपर्कात होते.

ही गोष्ट नियमाविरुद्ध आहे. यापूर्वी 2010 मध्ये रवींद्र जडेजादेखील राजस्थान रॉयल्स सोबत असताना दुसर्‍या संघासोबत चर्चा करण्याच्या प्रकरणात दोषी आढळला होता. त्याला एका वर्षासाठी लीगमधून निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे राहुल आणि राशीद दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील अशीच कारवाई होते का हे पाहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT