भारतीय अर्थव्यवस्था उसळणार; चीनची ढासळणार  
Latest

भारतीय अर्थव्यवस्था उसळणार; चीनची ढासळणार

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : तमाम देशवासीयांसाठी एक खूश खबर आहे. 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था उसळी घेणार असून, आपला देश जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनणार आहे; तर कुरापतखोर चीनची अर्थव्यवस्था ढासळणार आहे. हे भाकीत प्रतिष्ठित स्टँडर्ड अँड पुअर्स आणि मूडीजने वर्तविले आहे. भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत जगातील तिसर्‍या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनणार असल्याचा अंदाज स्टँडर्ड अँड पुअर्स (एस अँड पी) या पतमानांकन संस्थेने व्यक्त केला आहे; तर भारतीय अर्थव्यवस्थेला टक्कर देणारी
चीनची अर्थव्यवस्था आणखी गटांगळ्या खाणार असल्याचा इशारा मूडीज या पतमानांकन संस्थेने दिला आहे.

एस अँड पीने म्हटल्यानुसार, 2026 सालापर्यंत भारतातील सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) दर 7 टक्क्यांवर जाईल. अमेरिका, चीन, जर्मनी, जपाननंतर सध्या भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानी आहे. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने घोडदौड करीत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात भारत उत्पादन क्षेत्रातील प्रमुख केंद्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2023 पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असेल. पुढील आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.4 टक्के राहील. त्यानंतरच्या आर्थिक वर्षात हा दर 6.9 टक्के होईल. 2026-27 या सालात भारताचा जीडीपी 7 टक्क्यांवर जाईल. येत्या तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था झेपावणार आहे. सेवा क्षेत्रानंतर भारत उत्पादन क्षेत्रातही भरारी घेणार आहे. वर्कफोर्स अर्थात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार असून नजीकच्या काळात मनुष्यबळात महिलांचाही समावेश असणार आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

चीनच्या रिअल इस्टेटची निघाली दिवाळखोरी

चीनची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असल्याचे मूडीज या पतमानांकन संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील कर्ज बुडण्याची दाट शक्यता असल्याने चीनच्या आर्थिक विकासाचा दर खालावत आहे. चीनच्या विकासात रिअल इस्टेटचे मोठे योगदान आहे. या क्षेत्रामध्येच अनागोंदी माजल्याने चीनचा विकास ठप्प होत आहे. राजकीय तुटीवरही परिणाम होत आहे. त्यामुळे चीनचे रेटिंग नकारात्मक केल्याचे मूडीजने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT