ग्रुप कॅप्टन वरुण सिंह 
Latest

हेलिकॉप्टर अपघातात एकमेव वाचले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह ! याचवर्षी मिळाले होते ‘शौर्य चक्र’

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय लष्कराच्या सामर्थ्याला धक्का देणारी आज घटना घडली. देशाचे पहिले आणि सध्याचे तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपीन रावत यांचे हवाई दलाच्या हेलिकॉप्टर (Mi17-V5) अपघातात निधन झाले.

तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान कुन्नूर येथे हा अपघात झाला. या अपघातात CDS जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह ११ जणांचे निधन झाले. भारतीय हवाई दलाने (IAF) आपल्या ट्विटर अकाउंटवर याबाबत स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या हेलिकॉप्टर अपघातात भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह एकमेव जिवंत असून त्यांची मृ्त्यूशी झुंज सुरु आहे. यांचा नुकताच १५ ऑगस्ट रोजी देशातील प्रतिष्ठित शौर्य चक्र पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सन्मानित केले गेले होते. सध्या ते निलगिरी हिल्समध्ये चाचणी पायलट म्हणून कार्यरत होते. त्यांचा अनुभव पाहता लष्कराने त्यांना चाचणी वैमानिकाचा दर्जा दिला. वरुण यांच्या देखरेखीखाली लष्कराची विमानांचे उड्डाण होत होते. त्यांची आता मृत्युशी झुंज सुरु आहे.

वरुण सिंह हे मूळचे भोपाळचे आहेत. त्यांनी अदम्य धैर्य दाखवत १० हजार फूट उंचीवरून विमान सुरक्षितपणे उतरवले. आपल्या जीवाची पर्वा न करता वरुण यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवत लोकवस्तीच्या बाहेर विमान उतरवले होते.

वरुण यांना प्रतिष्ठित शौर्य चक्र पुरस्कार मिळाल्याच्या वृत्ताने त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला होता. कुटुंबात उत्सवाचे वातावरण होते. वरुण यांचे कुटुंब सनसिटी कॉलनीत राहते. त्यांचे संपूर्ण कुटुंब देशभक्त आहे. वडील आणि भाऊ यांनीही लष्करात सेवा बजावली आहे. वडील कर्नल केपी सिंह यांना अनेक पुरस्कार मिळाले.

देशाप्रती असलेल्या भक्तीमुळेच त्यांनी आपल्या मुलाला भारतीय हवाई दलात वैमानिक होण्यास प्रोत्साहन दिले. मुलाला शौर्य चक्र पुरस्कार मिळाल्याचे वृत्त समजताच कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला होता. वरुण यांच्या आई आई उमा सिंह यांनीही मुलाचा अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली होती. प्रदीर्घ काळ शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या उमा सिंह यांनी मुलाला देशसेवेचे संस्कार दिले. मुलानेही कुटुंब आणि समाजासह संपूर्ण देशाचे नाव रोशन केले.

संकटसमयी जीवाची पर्वा केली नाही…

संकटाच्या वेळी जीवाची पर्वा न करता वरुण यांनी अदम्य धैर्य दाखवले. १२ ऑक्टोबर २०२० रोजी वरुण हलक्या लढाऊ विमानाने उड्डाण करत होते. सुमारे १० हजार फूट उंचीवर पोहोचताच विमानाची उड्डाण नियंत्रण यंत्रणा निकामी झाली. वडील कर्नल केपी सिंह यांच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत सहसा पायलट आपला जीव वाचवण्यासाठी विमानातून उडी मारतात, परंतु वरुणने आपल्या जीवाची पर्वा केली नाही. आपत्तीच्या वेळी धैर्य, संयम आणि कौशल्य दाखवत विमान नागरी वस्तीपासून दूर नेले आणि यशस्वीरित्या उतरवले. वरुणच्या या निर्णयामुळे हजारो जीव वाचले.

विमानात अचानक झालेल्या बिघाडाची चौकशी आणि संशोधन करण्याची संधीही लष्कराला मिळाली.

२०२० मधील हवाई आणीबाणीच्या वेळी त्यांचे LCA तेजस लढाऊ विमान वाचवल्याबद्दल या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT