कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. 'हर घर तिरंगा' संकल्पनेतून घरोघरी तिरंगा ध्वज डौलाने फडकतो आहे. अनेक शासकीय इमारतींना करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे. तसेच वाहनांवरही तिरंगा ध्वजाचा दिमाख नजरेस पडतो आहे. तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून तो सोशल मीडियावरही व्हायरल केला जात आहे. अवघे शहरच सध्या तिरंगामय बनल्याचे दिसून येत आहे.
शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयांपासून ते अगदी गल्लीबोळांमध्येही 'हर घर तिरंगा' अभियान ठळकपणे दिसून येत आहे. 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांत प्रत्येकाने आपापल्या घरी तिरंगा ध्वज उभारण्याचे आवाहन करण्यात आले होते. पहिल्या दिवशीपासूनच याला सर्वत्र भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करत प्रत्येकजण राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखत असल्याचे दिसून आले.
कोल्हापूर पोलिस दलातर्फे सायकल रॅली, मॅरेथॉन, दुचाकी रॅली, जनजागृतीपर कार्यक्रम, पथनाट्यांचे सादरीकरण सुरू आहे. तसेच शहरातील मुख्य मार्गांवरून काढण्यात आलेली तिरंगा रॅली आकर्षणाचे केंद्र ठरली. पोलिस बँडच्या माध्यमातून मुख्य चौकांमध्येही देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण होत असल्याने वातावरणही प्रफुल्लित बनले आहे.
खरेदीची धांदल
शालेय ध्वजवंदनासाठी मुलांकरिता ध्वज, बिल्ले, गणवेश खरेदीलाही रविवारी गर्दी होती. महाद्वार रोड, ताराबाई रोड, पापाची तिकटी, बिंदू चौक, गंगावेस परिसरात खरेदीची धांदल सुरू होती.