कोलकाता ; वृत्तसंस्था : एकदिवसीय मालिकेप्रमाणे टी-20 मालिकेतही क्लीन स्वीपच्या तयारीत असलेल्या भारतीय संघाचा वेस्ट इंडिजविरुद्धचा (India vs West Indies) तिसरा सामना रविवारी (दि.20) कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. पहिले दोन सामने जिंकून भारताने निर्विवाद आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांना तिसर्या सामन्यात विजय मिळवून 3-0 असा व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. या सामन्यातून कर्णधार विराट कोहली, यष्टिरक्षक ऋषभ पंत या वरिष्ठ खेळाडूंनी माघार घेतली असल्याने राखीव फळीतील (बेंच स्ट्रेंथ) युवा फलंदाजांना आजमावण्याची संधी भारतीय संघ व्यवस्थापनाला आहे.
दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर सुरू झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) मालिकेत भारताने एकदिवसीय सामन्यात 3-0 असा व्हाईट वॉश दिला. त्यानंतर दोन टी-20 सामनेही जिंकले आहेत. आता तिसरा सामना जिंकून मालिकेचा शेवटही विजयाने करण्याचा रोहित सेनेचा मानस असेल.
पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली असली तरी सलामीवीर इशान किशनचे फलंदाजीतील अपयश डोळ्यावर येत आहे. पहिल्या दोन सामन्यांत त्याने 35 आणि 2 धावा केल्या आहेत. विंडीजच्या गोलंदाजांनी त्याची शैली ओळखून त्याला जखडून ठेवले होते. तिसर्या सामन्यात दडपण झुगारण्याचे आव्हान त्याच्यापुढे असेल.
मधल्या फळीत व्यंकटेश अय्यरने आपली जागा निश्चित केली आहे. आता त्याच्या जोडीला दुसरा अय्यर म्हणजे श्रेयस अय्यर संघात येऊ शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रवींद्र जडेजा उपलब्ध असल्याने आपली उपयुक्तता दाखवून देण्याची त्याला शेवटची संधी असेल. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरन आणि आर. पॉव्हेल यांच्याशिवाय इतर फलंदाजांनी निराशा केली आहे. गोलंदाजीत रोस्टन चेस वगळता बाकीचे गोलंदाज अपयशी ठरत आहेत. एक संघ म्हणून त्यांना एकत्रित चांगली कामगिरी करावी लागेल, तरच ते मालिकेचा शेवट गोड करू शकतात.
विराट, पंत घरी परतले (India vs West Indies)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाता येथे खेळल्या जाणार्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी विराट कोहली आणि ऋषभ पंत या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी, तसेच रविवारी होणार्या तिसर्या टी-20 सामन्यापूर्वी विराट कोहलीला बायो बबलपासून आरामासाठी ब्रेक देण्यात आला आहे. यानंतर विराट घराकडे रवाना झाला आहे. याशिवाय, ऋषभ पंतलाही बायो बबल ब्रेक देण्यात आला आहे. यामुळे आता या दोघांनाही वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्या टी-20 सामन्याला आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकावे लागणार आहे.