मुंबई : पुढारी ऑनलाईन : INDvsNZ Mumbai Test :टीम इंडियाने मुंबईतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला. भारताने न्यूझीलंडसमोर ५४० धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु किवी संघ केवळ १६७ धावाच करू शकला आणि सामना मोठ्या फरकाने गमावला. कसोटी क्रिकेटमधील धावांच्या बाबतीतही हा भारताचा सर्वात मोठा विजय आहे. आज (दि. ६) चौथ्या दिवशी जयंत यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवत एकट्याने ४ विकेट घेतल्या. तर आर. अश्विनने हेन्री निकोल्सला बाद करून टीम इंडियाला सर्वात मोठा विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव (२०२१)
दक्षिण आफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव (२०१५)
न्यूझीलंडचा ३२१ धावांनी पराभव (२०१६)
मुंबई कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ उपाहाराआधी न्यूझीलंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे. झालेही तसेच. चौथ्या दिवशी न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. दिवसातील सातव्याच षटकात (एकूण ५१.५) जयंत यादवने पाहुण्या किवी संघाला सहावा झटका दिला. त्याने रचिन रविंद्रला (५० चेंडूत १८ धावा) आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि तंबूचा रस्ता दाखवला. रवींद्र आणि हेन्री निकोल्स यांनी सहाव्या विकेटसाठी ९० चेंडूत ३३ धावांची भागीदारी केली. यावेळी किवी संघाची धावसंख्या ६ बाद १६२ होती. त्यानंतर जयंतने त्याच्या पुढच्याच षटकात पाहुण्यासंघाला दोन झटके दिले. ५४ व्या षटकाच्या दुस-या चेंडूवर काईल जेमिसनला (०) एलबीडब्ल्यू आणि टीम साउदीला (०) क्लिन बोल्ड करून माघारी धाडले. त्यानंतर पुन्हा एकदा ५५.१ व्या षटकात जयंत यादवच्या फिरकीची जादू पहायला मिळाली. यावेळी बळी ठरला विल्यम सॉमरविलेला. त्याला अवघी १ धाव काढता आली आणि तो बाद झाला. मयंक अग्रवालने त्याचा झेल पकडला. अखेर ५६.३ व्या षटकात आर. अश्विनने सामन्याचा शेवट केला. त्याने हेन्री निकोल्सला (४४) विकेटकिपर रिद्धीमान साहा करवी यष्टीचित करून टीम इंडियासाठी विजयी मोहोर उमटवली.
तत्पूर्वी, वानखेडेवरील कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात मयंक अग्रवालचे (१५०) शतक आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३२५ धावा केल्या. न्यूझीलंडसाठी एजाज पटेलने भारताच्या सर्व फलंदाजांना बाद करत १० विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात ६२ धावांत आटोपला. भरतीय गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. भारतातर्फे अश्विनने ४, मोहम्मद सिराजने ३, अक्षर पटेलने २ आणि जयंत यादवने १ गडी बाद केला.
पहिल्या डावात २६३ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने पाहुण्या किवी संघाला फॉलोऑन दिला नाही आणि फल्ंदाजी करण्याचा निर्णय घेतल. सलामीवीर मयंक अग्रवालने पुन्हा अर्धशतकी खेळी साकारली. तसेच चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिलच्या यांनी प्रत्येकी ४७-४७ धावा केल्या. तर अक्षर पटेलने फटेबाजी करून ४१ धावा कुटल्या. कर्णधार विराट कोहली ३६ धावांवर बाद झाला. अखेर टीम इंडियाने ७ बाद २७६ धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि किवी संघाला विजयासाठी ५४० धावांचे लक्ष्य दिले. या डावात न्यूझीलंडकडून एजाज पटेलने ४, तर रचिन रवींद्रने ३ बळी घेतले. अशाप्रकारे एजाज पटेलने सामन्यात १४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. भारताने एकूण ५३९ धावा केल्या.
दुस-या डावात न्यूझीलंडची पडझड झाली. तिस-या दिवसाअखेर किवी संघाची धावसंख्या ५ गडी गमावून १४० झाली. त्यानंतर चौथ्या दिवशी जयंत यादवने न्यूझीलंडच्या डावाल खिंडार पाडले आणि एकामागोमाग एक विकेट्स घेण्यात कसलीही कसर सोडली नाही. त्याने चौथ्या दिवशी पाहुण्या संघाचे चार फलंदाज बाद केले. त्यानंतर भारताला विजयासाठी एक विकेटची गरज असताना दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने हेन्री नोकोल्सला तंबूत पाठवून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.