Latest

IND vs NAM : नामिबियावरील विजयासह भारताचे अभियान समाप्त

रणजित गायकवाड

दुबई ; पुढारी ऑनलाईन : टी-20 विश्वचषकाच्या 'सुपर-12' फेरीतील अंतिम सामन्यात भारताने नामिबियाला (IND vs NAM) 9 विकेटस्नी सहज मात दिली. या विजयासह भारताने आपल्या वर्ल्डकप मोहिमेचा शेवट गोड केला. महत्त्वाचे म्हणजे भारताचा टी-20 कर्णधार म्हणून विराटचा तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा हा शेवटचा सामना होता.

रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकी गोलंदाजीपुढे नामिबियाचे फलंदाज अपयशी ठरले. 20 षटकांत नामिबियाला 8 बाद 132 धावांच करता आल्या. प्रत्युत्तरादाखल रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी अर्धशतके ठोकत भारताचा विजय सुकर केला.

गोलंदाजांनी नामिबियाला 132 धावांत रोखल्यानंतर फलंदाजांनीही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या सलामीवीरांनी मागील फॉर्म कायम राखत भारतासाठी दमदार सुरुवात केली. 'पॉवर प्ले'मध्ये भारताचे अर्धशतक पूर्ण झाले. आठव्या षटकात रोहितने अर्धशतक पूर्ण केले. हे रोहितचे 24 वे आंतरराष्ट्रीय टी-20 अर्धशतक ठरले. 10 व्या षटकांत नामिबियाचा वेगवान गोलंदाज जॅन फ्रायलिंकने रोहितला बाद केले. (IND vs NAM)

रोहितने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 56 धावा केल्या. रोहितनंतर सूर्यकुमार यादवने आक्रमक फटके खेळले. 16 व्या षटकात राहुलने चौकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुलने 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 54 तर सूर्यकुमार यादवने 4 चौकारांसह नाबाद 25 धावा केल्या.

तत्पूर्वी, टी २० विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने नामिबियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वरुण चक्रवर्तीच्या जागी राहुल चहरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात लिंजेनला (14) झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या क्रेग विल्यम्सला 'पॉवर प्ले'च्या शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने फिरकीत अडकवले.

आठव्या षटकात जडेजाने सलामीवीर बार्डला (21) पायचित पकडले. यानंतर ठरावीक अंतराने जडेजा-अश्विनने नामिबियाला धक्के दिले. अनुभवी फलंदाज डेव्हिड वीजने 26 धावांचे योगदान दिल्यामुळे नामिबियाला शतकी पल्ला ओलांडता आला. नामिबियाने 20 षटकांत 8 बाद 132 धावा केल्या. भारताकडून जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी 3 तर बुमराहने 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक (IND vs NAM)

नामिबिया : 20 षटकांत 8 बाद 132. (डेव्हिड वीज 26, स्टिफन बराड 21. रवींद्र जडेजा 3/16, आर. अश्विन 3/20.)

भारत : 15.2 षटकांत 1 बाद 136. (के. एल. राहुल नाबाद 54, रोहित शर्मा 56. जॉन फ्रायलिंक 1/20.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT