Latest

India Vs England Third Test : लीडस् मैदानावर ‘लीड’ मजबूत करणार

Arun Patil

लीडस् : वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड ( India Vs England Third Test )संघांमधील तिसरा कसोटी सामना आज, बुधवारपासून सुरू होणार असून, हेडिंग्लेच्या लीडस् मैदानावर भारताचा प्रयत्न पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असे लीड घेण्याचा असणार आहे. त्याचबरोबर खराब फॉर्मचा सामना करत असलेला कर्णधार विराट कोहलीचा प्रयत्न मोठी खेळी करण्याचा असेल.

कोहलीने आपले शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक हे नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावले होते. सध्या सुरू असलेल्या या मालिकेत तो दोनवेळा 40 च्या पुढे गेला होता; पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. तिसर्‍या कसोटी ( India Vs England Third Test )सामन्यात तो चांगल्या तंत्रासह फलंदाजी करेल, अशी अपेक्षा आहे.

चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा फॉर्म भारताच्या द‍ृष्टीने चिंतेचा विषय आहे; पण या दोघांनीही लॉर्डस् कसोटीच्या चौथ्या दिवशी जवळपास 50 षटके फलंदाजी करत फॉर्ममध्ये येण्याचे संकेत दिले आहेत. या दोघांच्या खेळीमुळे सामना हा पाचव्या दिवसापर्यंत गेला आणि भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवून दिला.

सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांचा फॉर्म हा चांगला आहे. मयंक अग्रवालच्या जागी संघात स्थान देण्यात आलेल्या राहुलने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. रोहितकडूनदेखील संघाला राहुलप्रमाणेच शतकी खेळीची अपेक्षा असेल. रिषभ पंत आपल्या शैलीत फलंदाजी करत आहे, तर रवींद्र जडेजाने सातव्या क्रमांकावर चांगली भूमिका पार पाडली.

हेडिंग्ले येथील परिस्थिती ही जलदगती गोलंदाजांना अनुकूल राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भारतीय संघ चार जलदगती गोलंदाजांसह सामन्यात उतरू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा अश्‍विनला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. शार्दुल ठाकूर हा फिट झाला आहे. त्यामुळे अंतिम अकराजणांच्या संघात त्याला संधी मिळते का, हे पाहावे लागेल.

पहिल्या कसोटी संघात स्थान न मिळालेल्या ईशांत शर्माने लॉर्डस् कसोटीत चांगली कामगिरी केली. मोहम्मद सिराज संघात आल्याने भारताचा गोलंदाजी मारा मजबूत झाला आहे. भारताने हेडिंग्ले येथे शेवटचा सामना 2002 मध्ये खेळला होता. तेव्हा भारताने एक डाव व 46 धावांनी विजय मिळवला होता.

दुसरीकडे, इंग्लंड संघात डेव्हिड मलान आल्याने त्यांची फलंदाजी मजबूत होण्यास मदत मिळेल. मलानने आपला शेवटचा कसोटी सामना तीन वर्षांपूर्वी खेळला होता; पण त्याच्याकडे प्रथम श्रेणी क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. मलान तिसर्‍या स्थानी खेळल्यास हसीब हमीदला रोरी बर्न्ससह सलामीला उतरावे लागू शकते. इंग्लंडच्या फलंदाजांना जो रूटची साथ द्यावी लागेल. मार्क वूडला दुखापत झाल्याने साकीब महमूदला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

संघ यातून निवडणार : India Vs England Third Test

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्‍वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकिपर), आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, के. एल. राहुल, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्‍वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनाथन बेयरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर (विकेटकिपर), सॅम कुरेन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, साकिब महमूद, डेव्हिड मलान, क्रेग ओवरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT