Latest

IND vs ENG 2nd Test : दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा, अँडरसनचे पुनरागमन

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्याच्या एक दिवस आधी इंग्लिश संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. त्यांनी दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. हे दोन्ही बदल गोलंदाजीतील आहेत. मार्क वुडला बाहेर बसवले असून त्याची जागी अनुभवी जेम्स अँडरसनचे पुनरागमन झाले आहे. तर दुखापतग्रस्त जॅक लीचला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे युवा ऑफस्पिनर शोएब बशीरला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

मालिकेतील पहिल्या कसोटीत मार्क वुडला एकही विकेट मिळाली नाही. सामन्याच्या दोन्ही डावात त्याचा मारा पूर्णपणे निष्प्रभ ठरला. त्यामुळेच अनुभवी अँडरसनचा दुस-या कसोटीसाठी प्राधान्याने विचार झाला असावा असे तज्ञांचे मत आहे. दुसरीकडे शोएब बशीर हा व्हिसाच्या समस्येमुळे भारता पोहचू शकला नव्हता. पण आता त्याला विशाखापट्टणम कसोटीतून पदार्पण करण्याची संधी मिळत आहे. (IND vs ENG 2nd Test)

हैदराबाद कसोटी इंग्लंडने 28 धावांनी जिंकली. ऑली पोपने दुसऱ्या डावात 196 धावा केल्या, तर टॉम हार्टलीने दुसऱ्या डावात सात बळी घेतले होते. या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 190 धावांनी पिछाडीवर पडूनही शानदार विजयाची नोंद केली.

IND vs ENG 2nd Test : दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

जॅक क्राउली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.

दुस-या कसोटीसाठी भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनची अद्याप घोषणा केलेली नाही. पण पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या कामगिरीने प्रभावित करणारे केएल राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे ते खेळणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यांच्या जागी सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या तिघांपैकी कोणला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT