Latest

India Vs England 3nd Test : लीडस् येथे हॅट्ट्रिकची संधी

Arun Patil

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : India Vs England भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना हा 25 ऑगस्टला हेडिंग्ले (लीडस्) येथे होणार आहे. भारतीय संघाने या मैदानावर 1967 नंतर एकही कसोटी सामना गमावलेला नाही. सोबतच भारताकडे या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचीदेखील संधी आहे.

गत सामना भारताने जिंकला डावाच्या अंतराने

भारत आणि इंग्लंड ( India Vs England)  यामधील हेडिंग्लेमध्ये शेवटचा सामना 2002 मध्ये झाला होता. या सामन्यात भारताने एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला होता. या मैदानावर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती आणि 8 बाद 628 धावसंख्येवर डाव घोषित केला होता. राहुल द्रविड (148 धावा), सचिन तेंडुलकर (193 धावा) आणि कर्णधार सौरव गांगुली (128 धावा) यांनी शतकी खेळी केली होती. इंग्लंड संघाला आपल्या पहिल्या डावात 273 धावांच करता आल्या आणि त्यांना फॉलोऑनचा सामना करावा लागला. इंग्लंडचा दुसरा डावदेखील 309 धावसंख्येवर आटोपला.

6 कसोटी सामने आतापर्यंत खेळले

भारताने हेडिंग्लेमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांना दोनमध्ये विजय आणि तीनमध्ये पराभूत व्हावे लागले. एक सामना ड्रॉ राहिला. 1952, 1959 आणि 1967 मध्ये भारतीय संघ येथे पराभूत झाला; पण 1979 मध्ये ड्रॉ सोबत भारताची पराभवाची मालिका खंडित झाली. यानंतर भारताने या मैदानावर 1986 आणि 2002 मध्ये विजय मिळवला. जर विराटच्या संघाने या मैदानावर विजय मिळवला तर तो या मैदानावर भारताची विजयाची हॅट्ट्रिक असेल.

दोन वर्षांपूर्वी झालेला शेवटचा कसोटी सामना

हेडिंग्ले येथे India Vs England शेवटचा कसोटी सामना हा ऑगस्ट 2019 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झाला होता. दुसर्‍या डावात बेन स्टोक्सच्या (135) नाबाद शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने एक विकेटने या सामन्यात विजय मिळवला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 179 धावा केल्या.तर, इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात 67 धावांच करता आल्या. ऑस्ट्रेलियन संघाने दुसर्‍या डावात 246 धावा केल्या. यानंतर इंग्लंड संघाने 9 बाद 362 धावसंख्येपर्यंत मजल मारत विजय मिळवला.

39 विकेटस् अँडरसनच्या नावे

हेडिंग्लेमध्ये सर्वात अधिक विकेटस् इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने मिळवले आहेत. त्याच्या नावे 10 सामन्यांत 46 विकेटस् आहेत. मात्र, ब्रॉडला दुखापत झाल्याने तो भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. जेम्स अँडरसनने येथे 10 सामन्यांत 39 विकेटस् मिळवल्या आहेत.

430 धावा ज्यो रूटच्या नावे

हेडिंग्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांच्या नावे आहे. त्यांनी चार कसोटी सामन्यांत 192.60 च्या सरासरीने 963 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून ज्यो रूटने या मैदानावर सर्वाधिक धावा केल्या आहेत. रूटने 7 कसोटी सामन्यांत 35.83 च्या सरासरीने 430 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT