पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील निर्णायक सामना आज (दि.9) पासून नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा निर्णायक कसोटी सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज हे दिग्गज नेते उपस्थित राहिले. त्यामुळे स्टेडियममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्टेडियमच्या बाहेरही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनावेळी 1 लाख 10 हजार प्रेक्षक क्षमतेच्या या स्टेडियमला भेट दिली होती. नामांतरानंतर ते प्रथमच येथे कसोटी सामना पाहत आहेत. सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही पंतप्रधानांनी स्टेडियममधील प्रेक्षकांना अभिवादन केले. (India vs Australia 4th Test)
सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना दोन्ही देशांचे पंतप्रधान आपापल्या संघातील खेळाडूंसोबत होते. पंतप्रधान मोदी टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज देखील कांगारू खेळाडूंसोबत राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहिले होते.
पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांना दोन्ही देशांमधील 75 वर्षांच्या क्रिकेट संबंधांचे चित्रण करणारी एक विशेष कलाकृती भेट दिली. तर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विशेष कलाकृती भेट दिली. सामनाच्या नाणेफेकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ याला कॅप भेट दिली. (India vs Australia 4th Test)
नाणेफेक झान्यानंतर रवी शास्त्री, पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज स्टेडियमच्या गॅलरीत पोहोचले. भारतीय क्रिकेटशी संबंधित अनेक खास क्षण येथे जतन करण्यात आले आहेत. रवी शास्त्री यांनी दोन्ही नेत्यांना त्याच्याबद्दल सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक सामन्यांची माहिती दिली. दोन्ही देशांमधील क्रिकेट सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे फोटोही येथे लावण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदी आणि अल्बनीज यांची भेट हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्रीला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या समारंभाचा एक भाग आहे. या सामन्यापूर्वी सोन्याचा मुलामा असलेल्या गोल्फ कारमधून दोन्ही पंतप्रधानांनी स्टेडियमचा फेरफटका मारला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज पहिल्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित आहेत. सामन्यापूर्वी, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आपापल्या संघाच्या कर्णधारांचा गौरव केला. शिवाय या कसोटी सामन्यासाठी कर्णधारांना विशेष कॅप दिली.