Latest

पुण्यात आज रंगणार भारत-श्रीलंका दुसरी टी-20 लढत; टीम इंडियात बदलांचे संकेत

अमृता चौगुले

पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिली लढत मुंबईत मंगळवारी झाली. या लढतीत भारताने 2 धावांनी शानदार विजय मिळवला. मालिकेतील दुसरी लढत उद्या 5 जानेवारीला येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल कर्णधार हार्दिक पंड्याकडून केले जातील, असे संकेत मिळाले आहेत. पुण्यातील दुसर्‍या लढतीत विजय मिळवून भारत मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल हे उघडच आहे. मुंबईतील पहिल्या लढतीत भारताने अखेरच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवला.

या सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव फक्त 7 धावांवर माघारी परतले. संजू सॅमसनला 5 धावा करता आल्या. आता दुसर्‍या लढतीसाठी टीम इंडिया तयारी करत असताना संघात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संजूला धावा करणे आवश्यक
संजू सॅमसनला बांगला देशविरुद्धच्या वन-डे मालिकेत संधी मिळाली नव्हती. त्यावरून जोरदार चर्चादेखील झाली होती. श्रीलंकेविरुद्ध संधी मिळाल्यावर मात्र तो अपयशी ठरला. त्यामुळे दुसर्‍या टी-20 लढतीत संजूच्या जागी राहुल त्रिपाठीला संधी दिली जाऊ शकते. दुसर्‍या टी-20 सामन्यात सलामीची जोडी म्हणून पुन्हा इशान किशन आणि शुभमन गिल यांना संधी दिली जाईल. इशानकडे अनुभव ही जमेची बाजू आहे. त्याचबरोबर शुभमनला आणखी एक संधी नक्कीच मिळू शकते. मधल्या फळीची जबाबदारी पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव, दीपक हुडा आणि कर्णधार पंड्या यांच्यावर असेल. पहिल्या सामन्यात दीपक आणि हार्दिक वगळता मधळ्या फळीतील अन्य फलंदाज अपयशी ठरले होते. संजू अपयशी ठरल्याने त्याच्या जागी राहुल त्रिपाठीला संधी दिली जाऊ शकते. संघ व्यवस्थापनाने जर पुन्हा एकदा संजूला संधी दिली तर त्याला कोणत्याही परिस्थितीत धावा करून दाखवाव्या लागतील.

संघ यातून निवडणार :

भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निशांका, अविष्का फर्नांडो, सदिरा समराविक्रम, कुशल मेंडिस, भानुका राजपक्षे, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिष तिक्षाना, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसून रजिथा, दुनिथ वेलगे, प्रमोद मुधुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.

आजचा सामना
स्थळ : एमसीए स्टेडियम, पुणे.
वेळ : सायं. 7 वाजता.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क, डीडी स्पोर्टस्वर

सुमार कामगिरीमुळे चहलची जागा धोक्यात

अष्टपैलू म्हणून स्थान दिलेला अक्षर पटेल पहिल्या सामन्यात महागडा ठरला. त्याने 3 षटकांत 31 धावा मोजल्या. मात्र, अखेरच्या षटकात त्याने 13 धावांचा बचावही केला. फलंदाजीतही त्याने हुडासोबत 68 धावांची भागीदारी रचली. संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या जागी दुसर्‍या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाऊ शकते. चहलने 2 षटकांत 26 धावा दिल्या. जलद गोलंदाजीचा विचार केला तर अर्शदीप सिंगचा संघात समावेश होऊ शकतो. त्याला हर्षल पटेलच्या जागी स्थान मिळू शकते. हर्षलने पहिल्या सामन्यात 2 विकेटस् घेतल्या खर्‍या. तथापि, 4 षटकांत त्याने 41 धावा दिल्या हेही तेवढेच खरे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT