Latest

Ravi Shastri : टीम इंडियाला उपकर्णधार नकोच, शास्त्री गुरुजींचे धक्कादायक विधान

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाने कधीही उपकर्णधार पदाची नियुक्ती करू नये, असे ठाम मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी व्यक्त केले. केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्यासंदर्भात त्यांनी हा टोला लगावल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. नागपूर कसोटीनंतर भारताने दिल्लीतही मोठा विजय मिळवला. आता दोन्ही संघ इंदूरमध्ये आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, उपकर्णधार पदावरून डच्चू मिळालेल्या केएल राहुलच्या स्थानाची सर्वाधिक चर्चा होत आहे. गेल्या तीन डावात त्याला केवळ 38 धावा करता आल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याला संघातून वगळण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेक माजी खेळाडूंनीही त्याच्याविरोधात राग आवळला आहे.

राहुलच्या जागी नव्या उपकर्धाराची निवड अजूनही झालेली नाही. अशातच माजी प्रशिक्षक शास्त्री (Ravi Shastri) यांनी या गोंधळावरून आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट भारतीय संघाने उपकर्णधार न निवडलेलेच बरे असा सल्ला दिला आहे.

'उपकर्णधार कोण हे संघ व्यवस्थापन टरवेल'

टीम इंडियाने मायदेशतील कसोटी मालिकेदरम्यान कधीच संघासाठी उपकर्णधार नेमू नये. आयसीसी रिव्ह्यू पॉडकास्टमध्ये शास्त्री (Ravi Shastri) यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले की, 'उपकर्णधार कोण असेल हे संघ व्यवस्थापन ठरवेल. त्यांना राहुलच्या फॉर्म आणि त्याची मानसिक स्थिती माहिती आहे. शुभन गिलकडे कसे पहायचे याबाबतही व्यवस्थापनाला चांगलेच कळते. त्याऐवजी मी माझ्या सर्वोत्कृष्ट इलेव्हनसह मैदानात उतरेन. कधी-कधी कर्णधाराला मैदानाबाहेर जावे लागले तर तत्कालीन परिस्थित कोणीही उपकर्णधाराची भूमिका पार पाडू शकतो. आपल्या गोष्टी क्लिष्ट करायच्या नसल्याने हे सोपे आहे, असेही शास्त्रींनी सांगितले.

केएल राहुलच्या फॉर्मवर शास्त्री म्हणाले, 'तो एक चांगला खेळाडू आहे आणि त्याने आपल्या छोट्या खेळीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर केले पाहिजे. त्याचा फॉर्म, त्याची मन:स्थिती पाहावी लागेल. भारतात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. जे संघाचे दार ठोठावत आहेत,' असे म्हणून राहुलला लवकर सुधारणा करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला.

'ऑस्ट्रेलियाचे नियोजन कमकुवत'

ते पुढे म्हणाले, 'निष्काळजीपणा आणि शिस्तीचा अभावामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले दोन सामने गमावले. त्यांचे नियोजन कमकुवत आहे. याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आता उरलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये आक्रमक भूमिका न घेता क्रीजवर नांगर टाकून उभारले पाहिजे. अवास्तव प्रयोग न करता मूलभूत गोष्टींकडे परत जाणे खूप महत्वाचे आहे,' असा सल्लाही शास्त्रींनी कांगारू संघाला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT