नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : महागाईने सर्वसामान्य पिचलेला असतानाच सरकारी आकडेवारी जाहीर झाली आहे. एप्रिलमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ७.७९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर अन्नधान्य चलनवाढीचा दर ८.३८ टक्के राहिला आहे. महागाईचा हा दर आठ वर्षांच्या उच्चांकावर आहे. यापूर्वी मे २०१४ मध्ये महागाई दर ८.३३ टक्के होता. तर मार्च २०२२ मध्ये किरकोळ महागाई ६.९५ टक्के होती. मार्चमध्येही महागाईचा दर १७ महिन्यांच्या उच्चांकावर होता.
सलग चौथ्या महिन्यात महागाई दराने RBI ची ६ टक्क्यांवरची मर्यादा ओलांडली आहे. किरकोळ महागाई फेब्रुवारी २०२२ मध्ये ६.०७ टक्के, जानेवारीमध्ये ६.०१ टक्के आणि मार्चमध्ये ६.९५ टक्के नोंदवली गेली. एका वर्षापूर्वी एप्रिल २०२१ मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर ४.२३ टक्के होता.
अलीकडेच, रिझव्र्ह बँकेने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण बैठकीनंतर, पहिल्या तिमाहीत महागाईचा अंदाज ६.३ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ५ टक्के, तिसर्यामध्ये ५.४ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.१ टक्के इतका केला होता. यानंतर, आर्थिक धोरणाच्या बैठकीत महागाईच्या चिंतेमुळे रेपो रेटच्या दरात ०.४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महागाईचे आकडे बघितले तर त्याचा परिणाम शहरांपेक्षा खेड्यांमध्ये जास्त दिसून आला आहे. एप्रिल २०२२ मध्ये, ग्रामीण स्तरावर किरकोळ चलनवाढीचा दर ८.३८ टक्के होता, तर शहरांमध्ये तो ७.०९ टक्के होता. त्याच वेळी, अन्नधान्याच्या चलनवाढीच्या बाबतीत, शहरी भागात अन्न महागाईचा दर ८.०९ टक्के होता, तर ग्रामीण भागात तो ८.५० टक्के होता. मार्च २०२२ मध्ये, शहरी स्तरावर महागाईचा दर ६.१२ टक्के होता, तर ग्रामीण पातळीवर तो ७.६६ टक्के होता. त्याच वेळी, मार्च २०२२ मध्ये अन्नधान्य महागाई दर देखील शहरी स्तरावर ७.०४ टक्के होता आणि ग्रामीण पातळीवर तो ८.०४ टक्क्यांवर पोहोचला होता.
जगभरातील अनेक अर्थव्यवस्था WPI (घाऊक किंमत निर्देशांक) हा महागाई मोजण्यासाठी त्यांचा आधार मानतात. भारतात असे घडत नाही. आपल्या देशात, WPI सोबत, CPI देखील महागाई मोजण्याचे प्रमाण मानले जाते.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर्थिक आणि पत (क्रेडिट) संबंधित धोरणे ठरवण्यासाठी किरकोळ महागाईला मुख्य मानक मानते, घाऊक किमती नाही. अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार WPI आणि CPI यांचा एकमेकांवर परिणाम होतो. अशा प्रकारे WPI वाढल्यानंतर CPI मध्ये देखील वाढ होते.
कच्च्या तेल, वस्तूंच्या किमती, उत्पादन खर्च याशिवाय इतर अनेक गोष्टी आहेत ज्या किरकोळ महागाईचा दर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सुमारे २९९ वस्तू आहेत, ज्यांच्या किमतीच्या आधारावर किरकोळ महागाईचा दर ठरवला जातो.