Latest

देशातील कोरोना रुग्णसंख्येत किचिंत घट! २४ तासांत ३ लाख नवे रुग्ण, ४३९ जणांचा मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख ६ हजार ६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या २७ हजार ४६९ ने कमी आहे. देशात सध्या कोरोनाचे २२ लाख ४९ हजार ३३५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २ लाख ४३ हजार ४९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट २०.७५ टक्के आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ७१.६९ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासांत १४ लाख ७४ हजार ७५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर रिकव्हरी रेट ९३.०७ टक्क्यांवर घसरला आहे.

याआधीच्या दिवशी देशात ३ लाख ३३ हजार बाधितांची भर पडली होती. तर ५२५ जणांचा मृत्यू झाला होता. पण गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत किचिंत घट झाली आहे.

दिल्लीतील कोरोनाचे संकट झाले कमी…

देशाची राजधानी दिल्लीतील कोरोनाचे संकट कमी झाले असून गत चोवीस तासात नवीन रुग्ण संख्येत ९ हजार १९७ ने भर पडली आहे. याच कालावधीत ३४ लोक मरण पावले आहेत. संक्रमण दरदेखील कमी होऊन १३.३२ टक्क्यांवर आला आहे. चोवीस तासात बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३ हजार ५१० इतकी आहे. गेल्या शनिवारी कोरोना रूग्ण संख्येत ११ हजार ४८६ ने भर पडली होती. त्यापाठोपाठ रविवारी हा आकडा दहा हजारच्या खाली आला होता.

नागपूरमधील ७६ निवासी डॉक्टर कोरोनाबाधित…

नागपूरमध्ये रुग्णांना सेवा देत असताना अनेक निवासी डॉक्टर कोरोनाबाधित होत आहे. मेडिकलमध्ये गेल्या १० दिवसांपासून सुमारे ७६ विविध विभागाचे निवासी डॉक्टर पॉझिटीव्ह आले आहे. सर्व निवासी डॉक्टर हे सौम्य लक्षणे असणारे आहे. यातील २२ डॉक्टर बरे होऊन परत सेवेवर रूजू झाले आहेत. २ डॉक्टर सध्या अॅडमिट असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ५२ डॉक्टर गृहविलगीकरणात असून काही घरी व काही शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विलगीकरण व्यवस्थेत राहत आहे.

मुंबईतील शाळा आजपासून सुरु…

मुंबईतील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. पुन्हा शाळेत परतल्याने विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहे. पालकांनीदेखील समाधान व्यक्त केले आहे.

नियमांचे पालन बंधनकारक…

शाळा सुरू होत असल्या, तरी पाल्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा पालकांनी घ्यायचा आहे. तसेच कोरोनाचे संकट बघता, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापनांवर असणार आहे. एखाद्या शाळेत विद्यार्थी किंवा शिक्षकांचे बाधित होण्याचे प्रमाण अधिक असल्यास, ती शाळा तातडीने बंद करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT