शक्तिशाली लष्कर  
Latest

शक्तिशाली लष्कराच्या यादीत भारत चौथ्या स्थानी

Arun Patil

लंडन, वृत्तसंस्था : जगातील सर्वात शक्तिशाली लष्कराच्या यादीत भारताने चौथे स्थान कायम ठेवले आहे. 'ग्लोबल फायरपॉवर' या संस्थेने जारी केलेल्या यादीत अमेरिकेने अव्वल स्थान कायम ठेवले आहे, तर भारतासाठी धोकादायक असलेले चीन व पाकिस्तान अनुक्रमे तिसर्‍या व सातव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, जगातील सर्वात कमजोर लष्कराच्या यादीत भारताचा शेजारी असलेला भूतानचा पहिला क्रमांक लागतो.

जगभरातील लष्करांचा अभ्यास करणार्‍या संरक्षणतज्ज्ञांचा गट असलेल्या 'ग्लोबल फायरपॉवर' संस्थेतर्फे दरवर्षी अशी यादी जाहीर केली जाते. 2023 च्या ताज्या यादीत जगातील 145 देशांच्या लष्करी सामर्थ्याचा अभ्यास करून समावेश करण्यात आलेला आहे. जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर अमेरिकेचे असून, त्यांचे स्थान या यादीतही अबाधित आहे. खालोखाल रशिया व चीन यांचा समावेश आहे.

मागील काही वर्षांत भारताने आपले लष्करी सामर्थ्य वाढवत नेले असून, जगातील बलाढ्य लष्करांत भारताचा गवगवा झाला आहे. यादीतील इतर देशांच्या क्रमवारीत बर्‍यापैकी अदलाबदल झाल्याचे दिसून येत असले, तरी पहिल्या पाचपैकी भारतासह चार देशांनी आपले स्थान कायम ठेवले आहे.

काय आहेत निकष…

ही क्रमवारी ठरवताना लष्कराचे संख्याबळ, संरक्षणासाठी होणारी आर्थिक तरतूद, तंत्रज्ञानाचा वापर, लष्करी साहित्य आणि ताफ्यांचे आधुनिकीकरण, सैन्यदलासाठी देण्यात येणार्‍या सुविधा, ताज्या मोहिमांतील कामगिरी,
शांतता कार्यात होणारे योगदान, अशा एकूण 60 घटकांचा अभ्यास करून त्यावर देशांच्या लष्करी सामर्थ्याचे स्थान निश्चित केले जाते.

पाकिस्तान पहिल्या दहांत

'ग्लोबल फायरपॉवर' नावाने दरवर्षी जगातील बहुतेक देशांच्या लष्करी सामर्थ्याचा अभ्यास करून यादी जाहीर केली जाते. भारत चौथ्या स्थानावर कायम आहे, तर ब्रिटन आठव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आला आहे. भारतासारखेच दक्षिण कोरियानेही आपले 6 वे स्थान कायम राखले आहे. पाकिस्तान पहिल्या दहा देशांच्या यादीत आला असून, तो सातव्या क्रमांकावर आहे. जपान आणि फ्रान्स गेल्यावर्षी अनुक्रमे पाचव्या व सातव्या स्थानावर होते. त्यांची यंदा अनुक्रमे आठव्या व नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.

रशिया दुसर्‍या ठिकाणावरच

युक्रेन युद्धामुळे अडचणीत आलेल्या रशियाने आपला दुसरा क्रमांक कायम ठेवला आहे. याबाबत संरक्षण अभ्यासकांत मतभेद असले, तरी एकूण आकारमान व खर्च याबाबतीत आजही रशियाने आपला मान कायम ठेवला आहे.

असे आहे भारतीय सैन्यदल

विभाग : लष्कर, नौदल, हवाई दल
संख्याबळ : 14 लाख सक्रिय, 21 लाख राखीव
बजेट : 74 अब्ज डॉलर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT