Latest

भारताची तुलना श्रीलंकेशी करत राहुल गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका, म्हणाले..

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा भारताची तुलना श्रीलंकेशी केली आहे. यावेळी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ग्राफिक्सच्या माध्यमातून भारताची वाटचाल श्रीलंकेच्या वाटेवर कशी सुरू आहे हे स्पष्ट केले आहे. त्यांनी तीन बाबी अधोरेखीत करून भारताची तुलना श्रीलंकेशी केली आहे. यात बेरोजगारी, पेट्रोलची किंमत आणि जातीय दंगली यांचा समावेश आहे. या तीन गोष्टींमध्ये भारत आणि श्रीलंका यांची तुलनात्मक माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून मांडली आहे. यामध्ये त्यांनी 2012 ते 2021 पर्यंतची आकडेवारी दाखवली आहे.

याआधीही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारताची श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीशी तुलना केली होती. श्रीलंकेत ज्याप्रमाणे सत्य जनतेपासून लपवले गेले, त्याचप्रमाणे भारतातही भाजप आणि आरएसएसच्या लोकांनी देशातील जनतेपासून सत्य लपवले आहे आणि ते सत्य हळूहळू सर्वांसमोर येईल, असा हल्लाबोल करत त्यांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

याआधीही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अनेकवेळा या मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल यांनी भाजप सरकारने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा टोला लगावला होता. ते म्हणाले होते की, भाजप सरकारने अर्थव्यवस्था रसातळा नेली आहे. पंतप्रधानांनी नोटाबंदी केली, जीएसटी चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केली, या कारणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली. याआधी देशात यूपीए सरकार असताना अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम करण्यात आले. आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की तरुणांना नोकरी मिळणेही कठीण झाले आहे आणि होत आहे.

भारताला रोजगार देणारा कणा मोडला

देशाला रोजगार देणारा कणा मोडला आहे, असे राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. भारताच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात तो काळ कसा असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. अशी परिस्थिती उद्भवणार आहे जी तुम्ही आयुष्यात कधीही पाहिली नसेल. या देशाला रोजगार देणारा कणा मोडला आहे, अशी टीका त्यांनी केली होती. गेल्या २-३ वर्षांत मीडिया, संघटना, भाजप नेते, आरएसएस यांनी सत्य लपवले आहे. हळुहळु सत्य बाहेर येईल. श्रीलंकेत हेच घडत आहे. तेथे सत्य बाहेर आले आहे. भारतात सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT