Latest

IND vs AUS Final : सट्टाबाजारात इंडिया हॉट फेव्हरेट

Arun Patil

कोल्हापूर : सलग दहा सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या भारताचा रविवारी (दि.19) ऑस्ट्रेलियाशी होत असलेल्या अंतिम सामन्यासाठी सट्टाबाजारही सज्ज झाला आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येपासूनच बुकींंनी भाव देण्यास सुरुवात केल्यामुळे सट्टाबाजारातील उलाढाल सुरू झाली आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच सट्टाबाजार इंडिया फेव्हरेट असून भारताला 40 पैसे तर ऑस्ट्रेलियाला 2 रुपये भाव दिला आहे. ऑनलाईन आर्थिक देवाणघेवाण सुरू झाल्यामुळे आणि तशा पद्धतीचे काही अ‍ॅप निघाल्यामुळे सट्टाबाजारात अधिक सुलभता आली आहे.

पूर्वी केवळ घोड्यावर चालणारा सट्टाबाजार नंतरच्या काळात विविध सामन्यांवर देखील चालू झाला. त्यामुळे सट्टाबाजारातील शब्द घोड्याशी संबंधितच पडले. सुरुवातीपासून हारण्याची शक्यता असलेल्या संघाला 'लंगडा घोडा' असे म्हणतात. हारणारा जिंकण्याच्या दिशेने चालला तर घोडा बहुत आगे दौड रहा है, असे म्हटले जाते. भाव विचारताना देखील कौनसा घोडा आगे है, असे विचारले जाते. पूर्वी शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतके बुकी होते; परंतु यात मिळणारा पैसा आणि उलाढाल पाहून सट्टा घेणार्‍यांची संख्या वाढू लागली.
ऑनलाईन पेमेंटची सुविधा नव्हती तेव्हा बुकींना रोख रक्कमच दिली जायची. त्यामुळे केवळ विश्वासावर सट्टाबाजार चालत असे.

महत्त्वाच्या सामन्यांसाठी म्हणजे भारत, पाकिस्तानसारख्या मोठी उलाढाल होण्याची शक्यता असलेल्या सामन्यांवर सट्टा घेण्यासाठी बुकींना सट्टा घेण्यासाठी एखादे हॉटेल किंवा मोठ्या बंगल्याची व्यवस्था करावी लागत असे; परंतु ऑनलाईन व्यवहारामुळे आता थेट पैसे ट्रान्स्फर करण्याची सोय झाली आहे. याशिवाय सट्टाबाजाराशी मिळतेजुळते काही अ‍ॅपच मोबाईलवर आहेत. त्यामुळे बुकींची धाकधूक कमी झाली आहे. असे असले तरी पोलिसांचा 'लोचा' मागे नको म्हणून शहरातील बुकींनी आपला मुक्काम गोवा व सीमा भागातील जिल्ह्यांमध्ये हलविला आहे.

सट्टाबाजारात नाणेफेक झाल्यानंतर भाव देण्यास सुरुवात होते; परंतु यावेळी सलग दहा सामने जिंकणार्‍या भारताला सट्टाबाजारात सर्वाधिक पसंती (हॉट फेव्हरेट) असल्यामुळे बुकींना सामन्याच्या पूर्वसंध्येपासून भाव देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सट्टाबाजारात आतापासूनच उलाढाल सुरू झाली आहे. रविवारी नाणेफेक कोण जिंकणार याला देखील बुकी भाव देणार असून त्यानंतर प्रत्येक चेंडूगणिक सट्टाबाजारात हालचल सुरू राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT