Latest

स्वातंत्र्य दिन विशेष : सातार्‍यातील गेंडा माळावर पाच क्रांतिकारकांना फाशी; सहा तोफेच्या तोंडी

अमृता चौगुले

सातारा : ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या 1857 च्या बंडात उठाव करणार्‍या 17 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्यामध्ये 5 क्रांतिकारकांना फाशी, 6 जणांना तोफेच्या तोंडी तर 6 जणांवर अमानुषपणे गोळ्या झाडण्यात आल्या. 165 वर्षांपूर्वी 8 सप्टेंबर रोजी सातार्‍यातील शाहूपुरी परिसरातील गेंडा माळावर घडलेली ही क्रांतिकारी घटना आजही स्वातंत्र्याच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देऊन जाते. मात्र, या गेंडा माळावरील हुतात्मा स्तंभ सध्या दुर्लक्षित झाला असून त्याला अवकळा आली आहे.

स्मारकाचे पावित्र्य जपण्याची मागणी

ज्या वडाला क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती तो वड काही वर्षांपूर्वी नष्ट झाला. या स्मारकाचा नव्याने विकास करण्याचे आव्हान असून त्याचे पावित्र्य जपण्याची इतिहासप्रेमींकडून मागणी होत आहे.

7 ऑगस्ट 1858 रोजी शिक्षा सुनावली, 8 सप्टेंबर 1858 रोजी अंमलबजावणी ब्रिटिशांनी 7 ऑगस्ट 1858 रोजी पकडलेल्या क्रांतिकारकांची मालमत्ता जप्त करून सर्वांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेची 8 सप्टेंबर 1858 रोजी अंमलबजावणी झाली. यामध्ये पाच क्रांतिकारकांंना फाशी, सहा जणांना गोळ्या घातल्या व इतर सहा जणांना तोफेच्या तोंडी दिले. इंग्रजांच्या निर्दयी कृत्यामुळे जेथे 17 क्रांतिवीरांना प्राणास मुकावे लागले. तीच ही हौताम्यभूमी फाशीचा वड म्हणून ओळखली जात आहे. त्याठिकाणी आज तो ऐतिहासिक फाशीचा वड नाही; पण येणार्‍या पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देईल, असा हुतात्मा स्तंभ आहे. पालिकेने या शहिदांचे शाहूपुरी येथे 'फाशीचा वड' येथे 2001 साली हुतात्मा स्मारक उभारले. सध्या दुर्लक्षामुळे या स्मारक परिसराला अवकळा आली आहे. येथील स्वच्छता अथवा तत्सम दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही.

या क्रांतिकारकांना दिले फाशी नारायण पावसकर-सोनार, केशव चित्रे, शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी (वाकनीस), सीताराम गुप्ते या क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. मुनजी भांदिगे, सखाराम शेट्ये, बाब्या गायकवाड, येशा गायकवाड, गणेश कारखानीस, नाना रामोशी या क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देण्यात आले.

रामजी चव्हाण, बाब्या कानगी रामोशी, नाम्या रामोशी, शिवाजी पोटाले (पाटोळे), पर्वती पोटाले (पाटोळे), पतालू येशू या क्रांतिकारकांना गोळ्या घालण्यात आल्या. या क्रांतिकारकांचा नामोल्लेख छत्रपती शिवाजी संग्रहालयातील नोंदीमध्ये आहे.

फितुरीमुळे उठाव झाला होता अयशस्वी…

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्यवादी धोरणामुळे देशातील अनेक संस्थाने त्याकाळी खालसा करण्यात आली होती. त्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, 1838 मध्ये क्रांतिकारक रंगो बापूजी गुप्ते यांनी अन्यायाविरुद्ध दाद मागितली. मात्र, निराश होऊन ते परत आले. तात्या टोपे व नानासाहेब पेशवे यांच्या मदतीने ते 1857 च्या उठावासाठी माणसे, पैसे व साहित्य मिळवण्यासाठी फिरत होते. त्यांनी पोलिसांत व इंग्रजी सैन्यात फितुरी माजवणे, शस्त्रे गोळा करणे, दारूगोळा तयार करणे असे नियोजन केले. मात्र, फितुरीमुळे हा उठाव अयशस्वी झाला होता.

रंगो बापूजी ब्रिटिशांना सापडलेच नव्हते…

1858 च्या ऑगस्टमध्ये तीन जणांचे एक लष्करी न्यायाधीश मंडळ नेमून चौकशी सुरू झाली. रंगो बापूजी सापडले नाहीतच; पण त्यांचा मुलगा सीताराम गुप्ते यांना बोरगाव येथे पकडण्यात आले. 'मी बंडात भाग घेतला होता', असे त्यांनी उघडपणे सांगितले. याचा खटला 15 मार्च ते 24 मार्च 1858 पर्यंत चालला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT