कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पद वर्ग 2 चे आणि पगार मात्र वर्ग 3 चा का? असा सवाल करत नायब तहसीलदारांच्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करा, या मागणीसाठी राज्यातील सर्व तहसीलदार व नायब तहसीलदारांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. आंदोलनामुळे पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील कामकाज जवळपास ठप्प झाले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले.
नायब तहसीलदार हे महसूल विभागातील वर्ग दोनचे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. मात्र या पदासाठी वर्ग तीन प्रमाणे पगार दिला जातो. वेतनश्रेणीतील ही तफावत दूर करावी, नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे वाढवावा, अशी मागणी 1998 पासून केली जात आहे. मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांच्या वतीने आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले. जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. या आंदोलनाला महसूल कर्मचारी संघटना, तलाठी महासंघ, उपजिल्हाधिकारी संघटना यांनी पाठिंबा दिला.
या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व नायब तहसीलदार आणि तहसीलदार सहभागी झाल्याने महसूल विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. सर्व तहसील कार्यालयाचे कामकाज जवळपास ठप्प झाले. दिवसभरात एकाही दाखल्याचे वितरण झाले नाही. या आंदोलनातून नैसर्गिक आपत्ती कायदा व सुव्यवस्था आणि निवडणूकविषयी कामकाज वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले. आंदोलनात जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, सहअध्यक्ष इचलकरंजीचे तहसीलदार शरद पाटील, कोषाध्यक्ष तहसीलदार चंद्रशेखर सानप, नायब तहसीलदार दिगंबर सानप यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते.