गुवाहाटी, वृत्तसंस्था : यंदा मायदेशात होणार्या आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेची तयारी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने नव्या वर्षातील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 67 धावांनी हरवून नव्या वर्षाचा दणदणीत प्रारंभ केला. रोहित शर्मा, शुभमन गिलची अर्धशतके आणि त्यानंतर विराट कोहलीने केलेले झंझावाती शतक (113) याच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे (IND VS SL) सामन्यात श्रीलंकेसमोर 50 षटकांत 7 बाद 373 धावा उभारल्या. हे आव्हान पार करताना श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने झुंजार शतक (नाबाद 108) ठोकत भारताला विजयासाठी 50 व्या षटकापर्यंत फरफटत नेले. त्याने नवव्या विकेटसाठी रजितासोबत नाबाद शतकी धावांची भागीदारी रचत श्रीलंकेला 50 षटकांत 8 बाद 306 धावांपर्यंत पोहोचवले. अखेर भारताने सामना 67 धावांनी जिंकला.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वन-डे सामन्यात भारताकडून विराट कोहलीने 87 चेंडूंत 113 धावा ठोकत सलग दुसरे शतक ठोकले. त्याचे हे वन-डे मधील 45 वे तर कारकिर्दीतील 73 वे शतक ठरले. मात्र, सलामीवीर रोहित शर्माला आपले शतक पूर्ण करता आले नाही. तो 67 चेंडूंत 83 धावा करून बाद झाला. या दोघांपाठोपाठ शुभमन गिलने देखील 70 धावांचे योगदान दिले.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने अखेरपर्यंत संघर्ष केला. सलामीवीर पथूम निसंका आणि चरिथ असलंका यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु उम्रान मलिकच्या वेगासमोर तेही नतमस्तक झाले. चरिथ 23 धावांवर उम्रानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. उम्रानने आजच्या सामन्यात 156 कि.मी. वेगाने चेंडू टाकला अन् वन-डे क्रिकेटमधील भारतीयाने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू ठरला. निसंका व धनंजया डी सिल्वा या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवली. निसंकाने अर्धशतक झळकावताना 72 धावांची भागीदारी केली. मोहम्मद शमीने अनुभव कामी आणताना धनंजयाला (47) बाद केले. उम्रानच्या वेगवान गोलंदाजीवर फटका मारण्याचा निसंकाचा प्रयत्न फसला अन् अक्षर पटेलने सोपा झेल घेतला. निसंका 80 चेंडूंत 11 चौकारांसह 72 धावांवर बाद झाला. (IND VS SL)
चहलने गुगली टाकून वानिंदूला एक उंच फटका मारण्यास भाग पाडले. श्रेयस अय्यर व उम्रान झेल टिपण्यासाठी समोरासमोर आले, परंतु अय्यरने चेंडूवर नजर कायम राखताना झेल टिपला. वानिंदू 7 चेंडूंत 16 धावा करून माघारी परतला. त्यानंतर श्रीलंकेचा डाव गडगडला अन् भारताने विजय मिळवला. कर्णधार दासून शनाकाने संघर्ष दाखवताना झुंजार शतक पूर्ण केले; परंतु श्रीलंकेला हार मानावी लागली. त्यांनी 8 बाद 306 धावांपर्यंत मजल मारली. शनाकाने 88 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 108 धावा केल्या.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणार्या भारताने 20 षटकांतच धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने पहिल्या पॉवर प्लेमध्ये आक्रमक सुरुवात केली. त्यानंतर शुभमन गिलने देखील गिअर बदलत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र 60 चेंडूंत 70 धावा केल्यानंतर तो बाद झाला.
गिल बाद झाल्यानंतर रोहितने फटकेबाजी करत संघाला 170 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र, शतकाच्या जवळ पोहोचला असताना मधुशनकाने त्याला 83 धावांवर बाद केले. रोहित बाद झाल्यावर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने भारताचे द्विशतक धावफलकावर लावले. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी रचली होती.
मात्र, धनंजया डीसिल्वाने अय्यरला 28 धावांवर बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. अय्यर बाद झाल्यावर के.एल. राहुल विराटला साथ देण्यासाठी आला. या दोघांनी आक्रमक भागीदारी रचत संघाला 41 व्या षटकात 300 च्या पार पोहोचवले. दरम्यान, विराट कोहलीचे अर्धशतक देखील पूर्ण झाले होते.
विराटने अर्धशतकानंतर आपला गिअर बदलला. दरम्यान, राहुल 39 धावा करून बाद झाला होता. मात्र, विराटने वन-डेमधील आपले सलग दुसरे शतक ठोकले. त्याने 87 चेंडूंत 113 धावा ठोकत भारताला 350 पार पोहोचवले. मात्र तो शेवटची दोन षटके राहिले असताना तो बाद झाला. भारताने 50 षटकांत 7 बाद 373 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून कासून रजिथाने 3 विकेटस् घेतल्या.
भारताने टाकले ऑस्ट्रेलियाला मागे
भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. टीम इंडियाने विक्रमी नवव्यांदा श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 हून अधिक धावा केल्या. भारताने या विक्रमाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे.