Latest

IND VS SL, 2nd ODI | भारताचे पारडे निर्विवाद जड;  श्रीलंकेविरुद्ध आज दुसरा एकदिवसीय सामना

दिनेश चोरगे

कोलकाता; वृत्तसंस्था :  पाहुण्या श्रीलंकेला लागोपाठ दुसर्‍यांदा तडाखा देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून उभय संघांमध्ये गुरुवारी दुसरा एकदिवसीय सामना येथील ईडन गार्डन मैदानावर रंगणार आहे. ( IND VS SL, 2nd ODI)

गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्याच सामन्यात भारताने श्रीलंकेवर 67 धावांनी दणदणीत विजय संपादन केला होता. त्यामुळे यजमान संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. विराट कोहली याला गवसलेला सूर ही भारताची जमेची बाजू म्हटली पाहिजे. त्याखेरीज अन्य फलंदाजही पूर्ण भरात आहेत. त्यामुळे दुसर्‍या लढतीत भारताला फलंदाजीची फारशी काळजी नाही. मात्र, श्रीलंकेचा संघदेखील जिगरबाज म्हणून ओळखला जातो. टी-20 मालिकेत त्यांनी भारताला हिसका दाखवला होता. त्यामुळे पाहुण्या संघाला कमी लेखण्याची चूक भारतास गोत्यात आणू शकते.

या लढतीसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघामध्ये काही बदल होऊ शकतात. सूर्यकुमार यादव याला श्रेयस अय्यर याच्याऐवजी संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोहम्मद शमी याच्या जागी अर्शदीर सिंग याला संधी मिळू शकते. तसे झाले तर भारतीय संघ आणखी समतोल होऊ शकतो. कागदावर भारतीय संघ भक्कम असल्याचे दिसते. शिवाय पहिल्याच सामन्यात मोठा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे श्रीलंकेचा संघ दडपणाखाली आल्याचे जाणवते.

खेळपट्टी आणि नाणेफेक

ईडन गार्डनची खेळपट्टी म्हणजे फलंदाजांसाठी पर्वणी मानली जाते. या ठणठणीत खेळपट्टीत धावा ठासून भरल्याचे क्युरेटरकडून सांगण्यात आले आहे. तथापि, जो संघ दुसर्‍यांदा फलंदाजी करेल त्याला जास्त फायदा मिळेल. याचे कारण म्हणजे थंडीमुळे मैदानावर जमा होणारे दवबिंदू. त्यामुळे चेंडूवर मजबूत पकड निर्माण करताना गोलंदाजांना कसरत करावी लागते. यास्तव जो कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकेल तो साधारणपणे गोलंदाजी करणे पसंत करेल. शिवाय येथील मैदानाचा इतिहास असे सांगतो की, दुसर्‍यांदा फलंदाजी करणारा संघ हमखास विजयी होतो. म्हणजेच नाणेफेकीचा कौल येथे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. (IND VS SL, 2nd ODI)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT