Latest

IND vs RSA : भारताची मालिकेत बरोबरी

Arun Patil

राजकोट ; वृत्तसंस्था : मालिका पराभवाचे संकट डोळ्यापुढे असताना भारतीय (IND vs RSA) संघाने बाऊन्स बॅक करीत दक्षिण आफ्रिकेवर सलग दुसरा विजय मिळवत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. राजकोटमध्ये झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 82 धावांनी हरवले. प्रथम फलंदाजी करणार्‍या भारताने 169 धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 87 (9 विकेट) धावांत गुंडाळले. भारताकडून दिनेश कार्तिक (55) आणि हार्दिक पंड्या (46) यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. तर आवेश खानने 4 विकेटस् घेतल्या. मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना रविवारी होणार आहे.

विजयासाठीचे 170 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला भारताने पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. सलामीवीर क्विंटन डिकॉक 14 धावांवर धावबाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात आवेश खानने ड्वेन प्रेटोरियसला शून्यावर बाद करत आफ्रिकेला दोन धक्के दिले. कर्णधार टेम्बा बवुमा (8) यापूर्वीच रिटायर्ड हर्ट झाला होता. (IND vs RSA)

युजवेंद्र चहलने इन फॉर्म बॅटस्मन क्लासनला 8 धावांवर बाद करत आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. यानंतर ड्युसेन आणि डेव्हिड मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. मात्र, हर्षल पटेलने डेव्हिड मिलरचा 9 धावांवर त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. या मालिकेत धोकादायक ठरलेला ड्युसेनचा (20) अडथळा आवेश खानने दूर केला. यानंतर मात्र दक्षिण आफ्रिकेचे शेपूट फारसे वळवळले नाही. त्यांची धडपड 16.5 षटकांत 9 बाद 87 वर येऊन थांबली. टेम्बा बवुमा पुन्हा मैदानात उतरला नाही.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. भारताची सुरुवात खराब झाली. एन्गिडीने दुसर्‍याच षटकात गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणार्‍या ऋतुराज गायकवाडला 5 धावांवर बाद केले. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने आजच्या सामन्यात देखील निराशा केली. त्याला मार्को येनसेनने 4 धावांवर बाद कर भारताला पॉवर प्लेमध्ये दुसरा धक्का दिला. त्यानंतर ईशान किशन आणि कर्णधार ऋषभ पंतने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र एन्रिच नोर्त्जेने 26 चेंडूंत 27 धावांची खेळी करणार्‍या ईशान किशनला बाद करत भारताला तिसरा आणि मोठा धक्का दिला.

किशन बाद झाल्यानंतर पंत आणि हार्दिकने डाव सावरत संघाला 80 धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, केशव महाराजने भारताचा कर्णधार ऋषभ पंतला 17 धावांवर बाद करत भारताला चौथा धक्का दिला. पंत बाद झाल्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने आल्यापासूनच आफ्रिकन गोलंदाजांवर हल्ला चढवला. दुसर्‍या बाजूने हार्दिकने देखील आक्रमक फटकेबाजी करत पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचली. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील कच्चे दुवे हेरून कार्तिकेने चौफेर फटकेबाजी केली. कार्तिक आक्रमक झाल्यामुळे हार्दिक शांत खेळत होता,

मात्र एन्गिडीने 31 चेंडूंत 46 धावा करणार्‍या हार्दिक पंड्याला बाद करत भारताला पाचवा धक्का दिला. दरम्यान, दिनेश कार्तिकने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र आपल्या आक्रमक फलंदाजीने भारतीय संघाला दीडशेचा टप्पा पार करून देणार्‍या दिनेश कार्तिकला प्रेटोरियसने 55 धावांवर बाद केले. अखेर भारताने 20 षटकांत 6 बाद 169 धावांपर्यंत मजल मारली. भारताने शेवटच्या पाच षटकांत 73 धावा चोपून काढल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT