पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सुरू असलेल्या आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पधेत रविवारी (दि.४) पाकिस्तान विरुद्ध सुपर- ४ फेरीतील एका रोमांचक सामन्यात भारताला पाच विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. भारताच्या या पराभवा मागे अनेक कारणे होती. पाकिस्तानचे फलंदाज, विशेषत: मोहम्मद रिझवान आणि फलंदाजीत बढती मिळालेला मोहम्मद नवाज यांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. तरी सुद्धा भारताने अशा पाच मोठ्या चुका केल्या ज्यामुळे एक वेळ जिंकेल असा वाटणारा सामना त्यांच्या हातातून पाकिस्तानने काढून नेला. आम्ही तुम्हाला क्रमाक्रमाने भारताकडून ज्या चुका झाल्या त्या सांगणार आहोत. ज्या द्वारे तुम्हाला ही समजेल की भारताने नेमके कोठे महत्त्वाच्या क्षणी चुका केल्या ज्यामुळे पाकिस्तानकडून पराभव स्विकारण्याची नामुष्की ओढवली.
१. अर्शदीपने सोडला अत्यंत सोपा झेल (Asia Cup 2022)
सामन्यात एक वेळ अशी आली होती की जिथे भारताला या सामन्यात पुनरागमानची संधी मिळणार होती. पाकिस्तानला १८ चेंडूत ३४ धावांची आवश्यकता होती. यावेळी खेळपट्टीवर आसिफ अली व खुशदिल शाह हे दोघीही ३ धावा करुन खेळत होते. यावेळी १८ व्या षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज रवी बिश्नोईने टाकला. मोठा फटका मारण्याच्या नादात आसिफ अलीचा झेल उडाला. हा अत्यंत सोपा झेल अर्शदीप सिंगने सोडला. गल्ली क्रिकेटमध्ये आपण अशा झेलला 'पेढा' दिला असे म्हणतो. असा साधा सोपा झेल अर्शदीपने सोडला. अखेर आसिफ अली हा ८ चेंडूत १६ धावा करुन अखेर नाबाद राहिला. हा झेल जर अर्शदीपने टिपला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
२. भूवनेश्वर कुमारचे सर्वात महागडे १९ वे षटक (Asia Cup 2022)
अखेरच्या दोन षटकात पाकिस्तानला विजयासाठी २६ धावा करायच्या होत्या. अशा स्थितीत कर्णधार रोहितने सर्वात अनुभवी भुवनेश्वरकडे चेंडू सोपवला, पण हे षटक भारताचे सर्वात महागडे षटक ठरले. भुवीने एक षटकार आणि दोन चौकारांसह १९ धावा दिल्या आणि हे भारताच्या पराभवाचे दुसरे सर्वात मोठे कारण ठरले.
३. सामन्यातील सर्वात महागडे 'पाच' षटके (Asia Cup 2022)
पाकिस्तानने कर्णधार बाबर आझम आणि फकर जमान यांची विकेट गमावल्यानंतर रिझवान आणि नवाज यांनी खेळपट्टीवर आपला जम बसवला. सामन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच ११ व्या षटकापासून ते १५ व्या षटकापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी प्रती षटक सरासरी १० हून अधिक धावा केल्या. या पाच षटकात फक्त धावाच कुटल्या नाहीत तर या दोघांनी आपली विकेट भारतीय गोलंदाजांना मिळू दिली नाही. अखेर १६ व्या षटकात भूवनेश्वर कुमारने नवाज बाद केले. पण, तो पर्यंत उशिर झाला होता कारण, रिझवानच्या साथीने पाकिस्तानला नवाजने विजया समिप आणले होते.
४. हार्दीक पंड्याचा फ्लॉप शो
साखळी सामन्यात पाकिस्तानच्या विरुद्ध हार्दीक पंड्याने गोलंदाजीत तीन बळी तर फलंदाजीत अखेर पर्यंत खेळपट्टीवर राहून विजय मिळवून दिला होता. त्या सामन्याचा तो हिरो होता. पण, सुपर ४ मधील रविवारच्या सामन्यात टीम इंडियाचा सर्वात मोठा स्टार हार्दिक पंड्या अपयशी ठरला. फलंदाजीत सर्वजण त्याच्याकडे मोठ्या खेळीसाठी पाहत असताना त्याला खातेही उघडता आले नाही. शिवाय गोलंदाजीत चार षटकात त्याने ४४ धावा देत केवळ एक विकेट मिळवली. हार्दिकचा शो पूर्णपणे फ्लॉप ठरला, जे भारताच्या पराभवाचे चौथे सर्वात मोठे कारण ठरले.
५. स्फोटक सुरुवात करुन ही मोठी धावसंख्या उभारण्यात आले अपयश
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी आक्रमक सुरुवात केली आणि पाच षटकांत ५४ धावा फलकावर लावल्या. पण दोघेही पुढील सहा चेंडूत बाद झाले. दोघांनी २८ – २८ धावा केल्या. पण, स्फोटक अशा सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर भारताला करता आले नाही. या दोघांपैकी एक तरी फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहिला असता तर मोठा फरक पडला असता, जसा मोहम्मद रिझवानने पाकिस्तानसाठी खेळी केली तशाच खेळीची अपेक्षा दोघांपैकी एका सलामीवीरांकडून होती. चांगल्या सुरुवातीचे रुपांतर चांगल्या शेवटात करता आले नाही हे दुर्दैव आणि हेच भारताच्या पराभवाचे हे पाचवे सर्वात मोठे कारण होते.