Latest

ऋषभ पंतचे शतक ; जडेजासह द्विशतकी भागीदारीने डाव सावरला

Shambhuraj Pachindre

बर्मिंगहम : वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत पावसाने बाधित झालेल्या पहिल्या दिवशी भारताने शंभरीच्या आतच पाच विकेट गमावल्या होत्या. पण यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (146) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (नाबाद 83) यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या 222 धावांच्या भागीदारीमुळे भारताने पहिल्या दिवसअखेरीस 7 बाद 338 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन याने 3 विकेट घेतल्या. पावसामुळे पहिल्या दिवशी 73 षटकांचाच खेळ झाला; तर 17 षटकांचा खेळ वाया गेला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी शुक्रवारपासून एजबेस्टन येथे सुरू झाली. गेल्या वर्षी भारताने केलेल्या इंग्लंड दौर्‍यातील पाचवा सामना कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या अनुपस्थितीत चेतेश्‍वर पुजारा आणि शुभमन गिलने डावाची सुरुवात केली. दोघांनी सावध खेळी करत पाच षटकांत 18 धावांवपर्यंत मजल मारली. जेम्स अँडरसनने भारताला पहिला धक्‍का दिला.

त्याने 17 धावा करणार्‍या शुभमन गिलला स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. गिल बाद झाल्यानंतर चेतेश्‍वर पुजारा आणि हनुमा विहारीने भारताचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण अँडरसनने भारताची भिंत म्हणून ओळखल्या जाणार्‍या चेतेश्‍वर पुजाराला 13 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्‍का दिला. ढगाळ वातावरणाचा फायदा घेत जेम्स अँडरसनने वेगवान गोलंदाजी करीत भारतीय फलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहलीने सातव्या चेंडूवर आपले खाते उघडले. मात्र त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबवण्यात आला. त्यानंतर पंचांनी उपाहाराची घोषणा केली.

पावसानंतर खेळ सुरू झाल्यानंतर मॅटी पॉटसने भारताला दोन धक्के दिलेे. त्याने 20 धावा करणार्‍या हनुमा विहारीला पायचित बाद केले. विहारीपाठोपाठ 11 धावा करणार्‍या विराट कोहलीला देखील बोल्ड करत भारताला पॉटसने चौथा धक्‍का दिला. या महत्त्वाच्या सामन्यात रोहित आणि राहुल यांच्या अनुपस्थितीत विराटकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु तो या सामन्यातही अपयशी ठरला. यानंतर जेम्स अँडरसनने श्रेयस अय्यरला 15 धावांवर बाद करत पाचवा धक्‍का दिला. अँडरसनची ही आतापर्यंतची तिसरी शिकार होती.

मात्र त्यानंतर ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा या डावखुर्‍या जोडीने भारताचा डाव 5 बाद 98 धावांपासून सावरायला सुरुवात केली. ऋषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत धावांची गती वाढवली. तर दुसर्‍या बाजूने जडेजाने त्याला सावध पवित्रा घेत चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करत दिवसाच्या तिसर्‍या सत्रात भारताला 200 चा टप्पा पार करून दिला.

ऋषभ पंतने आपले कसोटीतील पाचवे शतक ठोकले. त्याने 89 चेंडूंतच शतकी खेळी पूर्ण केली. त्या पाठोपाठ जडेजाने देखील अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या विकेटची भागीदारी 150 पार नेली तसेच भारताच्या 250 धावा देखील धावफलकावर लावल्या. दमलेल्या इंग्लिश गोलंदाजांची त्यानंतरही पंत आणि जडेजाने धुलाई कायम ठेवत आपली भागीदारी द्विशतकापर्यंत नेली. याचबरोबर भारताने 300 चा टप्पा पार केला. अखेर ऋषभ पंतचा झंझावात पार्टटाईम गोलंदाज जो रूटने रोखला. त्याने पंतला 146 धावांवर बाद करत भारताला सहावा धक्‍का दिला. त्याच्या जागी आलेला शार्दुल ठाकूर (1) लगेच बाद झाला. त्यानंतर जडेजाने मोहम्मद शमीच्या साथीने दिवस खेळून काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT